Advertisement

जाधव- अंधारे वादावर शिंदेंच्या शिवसेनेची काय आहे भूमिका?

प्रजापत्र | Friday, 19/05/2023
बातमी शेअर करा

बीड - शिवसेना (उबाठा) चे पदाधिकारी असलेल्या सुषमा अंधारे आणि आप्पासाहेब जाधव यांच्यातील राडयानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेने देखील या वादात उडी घेतली आहे. सदरचा प्रकार घृणास्पद असून आम्ही याचा धिक्कार करतो, पोलिसांनी स्वत:हून यात आप्पासाहेब जाधववर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी केली तर हा वाद आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणातून झाला असून आप्पासाहेब जाधव सारख्या असंस्कारी लोकांना शिंदेंच्या शिवसेनेत जागा नाही असे जिल्हाप्रमुख सचीन मुळूक यांनी म्हटले आहे. गुरुवारी रात्री आप्पासाहेब जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यात राडा झाल्या नंतर हे शिंदे सेनेचे षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याला आज पत्रकार परिषदेतून माजी मंत्री प्रा. सुरेश नवले आणि शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचीन मुळूक यांनी जोरदार उत्तर दिले. सदरचा प्रकार घृणास्पद आहे. मात्र अजूनही चळवळीतल्या सुषमा अंधारे यात तक्रार देत नाहीत, त्या महिलांचे प्रबोधन काय करणार? त्यांना कदाचित पक्ष कारवाई करेल अशी भिती असावी. मात्र पोलीसांनी यात स्वत:हून कारवाई करावी असे माजी मंत्री नवले म्हणाले. तर या महाप्रबोधन सभेसाठी शिवसेना (उबाठा) च्या पदाधिकाऱ्यांनी व्यापारी, अधिकारी यांच्यावर दबाव टाकून पैसे जमविले होते. त्याच्या देवाणघेवाणीतून हा वाद झाला. याच्याशी आमच्या शिवसेनेचा काही संबंध नाही. महिलांवर हात उचलण्याचे बाळासाहेब आणि दिघे यांचे संस्कार नाहीत. असल्या असंस्कारी माणसांना आमच्याकडे जागा नाही असे जिल्हाप्रमुख सचीन मुळूक यांनी सांगितले. तसेच शिवसेना (उबाठा) मध्ये आप्पासाहेब जाधव हे पैसे देऊनच जिल्हाप्रमुख झाले होते असा आरोपही सचीन मुळूक यांनी केला.

Advertisement

Advertisement