शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक 18 जून रोजी मुंबईत होत आहे. शिवसेना फुटीनंतर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारी 2023 रोजी संपली होती. त्यानंतर प्रथमच ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कायदेशीर, तांत्रिक बाबींची पूर्तता
विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या याचिकांवर कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी ठाकरे गटातर्फे पावले उचलली जात आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी सदस्य आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. दुसरीकडे, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयास आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून उन्हाळी सुट्टीनंतर जुलैमध्ये ती सुनावणीसाठी येईल. त्यामुळे आयोगाच्या निर्णयानुसार शिंदे गट हाच मूळ शिवसेना पक्ष आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरदेखील आधी पक्ष कोणाचा हे ठरवणार आहेत. त्यानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेणार आहेत. त्यात आपली बाजू भक्कम रहावी, यासाठी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे.
कायदेतज्ज्ञांशी सल्ला करणार
विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी तसेच सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवश्यक ठराव आणि कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल. आमचा गट हीच मूळ शिवसेना आहे, असा ठाकरे गटाचा दावा आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केल्यास वसेना मूळ पक्षावरील अधिकार सोडल्याचा निष्कर्ष काढला जाण्याची भीती आहे. त्यामुळे कायदेतज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी शिवसेना राष्ट्रीय, राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी तालुका पातळीपासूनच्या सुमारे तीन-साडेतीन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रांत ही बैठक होईल. शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जूनला होणार असून ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार आहे.
महाराष्ट्रातही भाजपला गाडायचे- ठाकरे
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आज ‘शिवसेना भवन’ येथे पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. कर्नाटकात कानडी जनतेने जसे भाजपला गाडले तसेच महाराष्ट्रातही भाजपला गाडायचे आहे, असा निर्धार यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात जातीय दंगली झाल्या नव्हत्या. मात्र मिंधे सरकार आल्यावर जातीद्वेषाचा कोंब बाहेर फुटून दंगली भडकू लागल्या आहेत, अशी तोफही उद्धव ठाकरे यांनी डागली.