Advertisement

पंढरीला देवदर्शनासाठी जाताना मिरजेत ट्रॅक्टर काळ बनून आला

प्रजापत्र | Wednesday, 17/05/2023
बातमी शेअर करा

मिरजजवळ वड्डी गावच्या हद्दीत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने विटा घेऊन येत असलेल्या भरधाव ट्रॅक्टर आणि बोलेरोची समोरासमोर धडक होऊन एकाच कुटुंबातील पाच जणांचा अंत झाला. अपघातग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे गावचे आहेत. पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असतानाच वाटेतच ट्रॅक्टर काळ बनून आल्याने हकनाक कुटुंबाचा बळी गेला आहे.

 

अपघातात पाच जणांचा जागीच अंत 
या अपघातात सरवडेमधील जयवंत पवार (वय 45 वर्षे) सोहम पवार (वय 12 वर्षे), कोमल शिंदे (वय 60 वर्षे), लखन शिंदे (वय 60 वर्षे) आणि बोलेरो चालकाचा समावेश आहे. जयवंत पवार यांच्या पत्नी आणि मुलगी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी मिरजेपासून सुरु झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर चालक विटा घेऊन जात असताना पवार कुटुंबीय असलेली बोलेरो कार अत्यंत भरधाव वेगाने जाऊन ट्रॅक्टरला समोरुन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरो ट्रॅक्टरमध्ये घुसली गेली. यामध्ये पाच जणांचा जागीच अंत झाला. मिरजजवळ वड्डी गावाजवळ हा अपघात घडला. जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

रत्नागिरी नागपूर महामार्गाचे काम वेगात सुरु असून मिरज बायपासवर हा अपघात झाला. मिरज बायपास मार्गावरून फक्त दोन दिवसांपूर्वी वाहतूक सुरु झाली आहे. आज (17 मे) जयवंत पवार पत्नी, दोन मुले आणि सासू सासऱ्यांसह पंढरपूला देवदर्शनासाठी सरवडेतून गाडी भाड्याने करून निघाले होते. त्यांनी शेळेवाडीमधील बोलेरी गाडी (MH-09-DA-4912) देवदर्शनासाठी बुक केली होती. या गाडीने जात असताना बायपास रोडवर राँग साईडने विटा घेऊन ट्रॅक्टर येत होता. त्यामुळे बोलेरो आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत, अन्य एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी महामार्ग पोलिसांनी तत्परता दाखवली. अपघाताची माहिती समजताच सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली, पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

 

सरवडे गावावर शोककळा 
दरम्यान, सकाळी देवदर्शनासाठी निघालेलं कुटुंब अपघातात गेल्याने सरवडेमधील गावकऱ्यांना सुद्धा धक्का बसला. अपघाताची माहिती समजताच गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. अपघातग्रस्त पवार कुटुंबीयांचे नातेवाईक सांगलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

Advertisement

Advertisement