Advertisement

छ.संभाजीनगरात कांद्याला रुपयाचा भाव

प्रजापत्र | Tuesday, 16/05/2023
बातमी शेअर करा

छ.संभाजीनगर - गेल्या काही दिवसांपासून कांद्याला (Onion) कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकाला रुपया किलो भाव मिळत असल्याने छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा आक्रमकपणा पाहायला मिळत आहे. तर शेतकऱ्यांनी गंगापूर बाजार समितीमध्ये होणारा कांद्याचा लिलाव बंद पाडला आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी गंगापूर महामार्गावर उतरत रस्ता बंद पाडला आहे. कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरु केला आहे. त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब वाहनाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. 

 

रस्त्यावर उतरत शेतकऱ्यांनी गंगापूर महामार्ग बंद पाडला
गेल्या काही दिवसांपासून कांद्याला दोन ते तीन रुपये किलोचा भाव मिळत आहे. रात्रंदिवस मोठ्या कष्टाने कांद्याला शेतकऱ्यांनी पिकवलं खरं, पण आता त्याला कवडीमोल भाव मिळत आहे. राज्यभरात अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याला अवघ्या एक रुपयाचा भाव मिळत आहे. दरम्यान गंगापूर बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला असता एक रुपयाचा भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरत गंगापूरचा महामार्ग बंद पाडला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळतेय. तर याची माहिती मिळतात गंगापूर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप असल्याने, शेतकरी रस्त्यावरुन उठण्यास नकार देताना पाहायला मिळतात. कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी देखील यावेळी शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत. तर पोलिसांकडून शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करण्याची विनंती केली जात आहे.

Advertisement

Advertisement