IPL 2023 च्या एका सामन्यात, 14 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चे संघ समोरासमोर होते. या सामन्यात कोलकाताचा कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंह यांनी शानदार खेळी खेळली, ज्यामुळे चेपॉक स्टेडियमवर कोलकाता संघाने चेन्नईविरुद्धचा सामना जिंकला.
मात्र, स्लो ओव्हर रेटमुळे नितीश राणाला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. नितीशने आयपीएलच्या या मोसमात दुसऱ्यांदा ही चूक केली असून, 'आयपीएल कोड ऑफ कंडक्ट'मुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. 8 मे रोजी इडन गार्डनवर पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यातही केकेआरचा कर्णधार नितीशला निर्धारित वेळेत षटके टाकता आली नव्हती.
नितीश व्यतिरिक्त, संघाच्या प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट बदली खेळाडूवर 6 लाख किंवा 25% मॅच फी, जे कमी असेल तो दंड लावण्यात आला आहे. या संदर्भात आयपीएलने एक प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे.
इतर कर्णधारांनाही स्लो रेटचा दंड
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला 24 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. 23 एप्रिल रोजी, आरसीबीने आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा स्लो रेटशी संबंधित चूक केली. यामुळे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
त्याच वेळी, आरसीबीच्या प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेले उर्वरित खेळाडू आणि इम्पॅक्ट सबस्टिट्यूट यांनाही दंड ठोठावण्यात आला. त्यांना 6 लाख रुपये किंवा 25 टक्के मॅच फी यापैकी जे कमी असेल ते भरावे लागले. याशिवाय गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनाही स्लोओव्हर रेटशी संबंधित आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
स्लोअर रेटवर काय कारवाई?
प्रत्येक सामना तीन तास 20 मिनिटांत संपला पाहिजे, हे आयपीएलचे ध्येय आहे. पण, अनेक आयपीएल सामने चार तासांपेक्षा जास्त काळ चालतात. जर एखाद्या संघाच्या कर्णधाराने पहिल्यांदा स्लो ओव्हर रेट केला तर त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. दुसरीकडे, जर कर्णधाराने स्लोओव्हर रेटची पुनरावृत्ती केली तर संपूर्ण संघाला दंड आकारला जातो.