Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - कर्नाटकचा सांगावा

प्रजापत्र | Monday, 15/05/2023
बातमी शेअर करा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देण्यात कॉंग्रेसला यश आले. हा विजय कॉंग्रेससाठी जितका महत्वाचा आहे, त्यापेक्षाही भाजपसाठी जास्त धक्कादायक आहे. धार्मिक धृविकरणाचा अजेंडा वापरुन आणि जातीय समीकरणे जोडून, सामान्यांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तरी सत्ता मिळविता येते हा जो  अतिविश्वास भाजपला होता, त्याला हा मोठा धक्का आहे. तसेच खंबीरपणे लढले तर काय होते हे कर्नाटक कॉंग्रेसने दाखवून दिले आहे. कर्नाटकमधून सत्ताभ्रष्ट झाल्याने आता दक्षिण भारत भाजप मुक्त झाला आहेच, पण त्यासोबतच भाजपा विरोधकांना देखील यातून मोठे बळ मिळणार आहे.

 

कर्नाटक हे देशातील एक प्रमुख राज्य आहे. या देशातील संपन्न अशा खनिज संपत्तीमुळे या राज्यावरची सत्ता सर्वच राजकीय पक्षांना कायम महत्वाची वाटत आली. देशाच्या राजकारणात या राज्याकडे 'द्रौपदीची थाळी' म्हणून पाहिले जाते. या राज्याने २००८ पर्यंत भाजपला कधी फारशी संधी दिली नव्हती. दक्षिण विजयाचे प्रवेशद्वार म्हणून भाजप १९८७ पासून या राज्याकडे पाहत असला तरी भाजपला या राज्यात स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी २००८ ची वाट पाहावी लागली होती. त्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने नाकारल्यानंतरही भाजपने कशा पध्दतीने ऑपरेशन लोटस राबविले, कॉंग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना राजीनामे द्यायला लावून या ठिकाणी भाजपने कशी सत्ता मिळवली हे देशाने पाहिले होते. मागच्या सत्ता काळात या राज्यात बोकाळलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई या समस्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आणि लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कधी हिजाब, कधी टिपू सुलतान या विषयांवर राजकारण करीत केवळ धार्मिक धृविकरणाच्या आधारे पुन्हा सत्ता मिळविता येईल हे भाजपचे स्वप्न होते. विधानसभा निवडणुकीत बजरंग दल आणि बजरंगबली एकच आहेत असे भासविण्याचा विषय असेल किंवा 'केरला स्टोरी' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न असेल, असल्या युक्त्याप्रयुक्त्यांनी सत्ता मिळविण्याच्या भाजपच्या स्वप्नांना कर्नाटकी जनतेने केवळ सुरुंगच लावला नाही, तर भाजपचे सारेच मनसुबे उखडून फेकले आहेत.
     मागच्या पाच सहा वर्षात भाजपची, त्यातही नरेंद्र मोदींची जी अजिंक्य, अजेय अशी प्रतिमा रंगविली गेली, त्या प्रतिमेचा बुरखा फाडण्याचे काम कर्नाटकाने केले आहे. सारा देश भाजपमय करण्याचे स्वप्न पाहण्यात काही गैर नाही, मात्र कॉंग्रेस मुक्त भारत सारख्या घोषणा देत भाजपच्या सुरु असलेल्या राजकारणाला कर्नाटकाचे निकाल ही सणसणीत चपराक आहे. भाजपला लोकसभेत भलेही बहुमत मिळाले, मात्र देशातील सर्व राज्ये जिंकता कधीच आली नाहीत. आजघडीला दक्षिण  भारतातील एकाही राज्यात भाजपची सत्ता नाही, छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल येथे भाजप सत्तेच्या बाहेर आहे. पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली येथे भाजपला सत्ता मिळविता आलेली नाही. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात भाजप कशाप्रकारे सत्तेवर आला हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच भाजपच्या स्वत:च रंगविलेल्या अजेय, अजिंक्य प्रतिमेच्या कर्नाटकाने चिंधड्या उडवल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सत्तेचा शक्य तितका गैरवापर करुन पाहिला. कॉंग्रेसचे डीके शिवकुमार यांना जेलमध्ये पाठविले, त्यांच्या २३ वर्षीय मुलीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला, पण हा माणूस बधला नाही, ठामपणे भाजपच्या विरोधात उभा राहिला. सिद्धरामय्या असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे, मागच्या खूप वर्षानंतर प्रथमच कॉंग्रेस ठामपणे लढायचे आहे या भूमिकेत होती. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची खिल्ली उडविली जात असताना, राहुल गांधींची खासदारकी संपविली जात असताना राहुल आणि प्रियंकांनी ज्या पध्दतीने कर्नाटक कॉंग्रेसला बळ दिले आणि आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात, सत्तेच्या गैरवापराच्या विरोधात,  महागाई, भ्रष्टाचाराच्या विरोधात, धर्मांधतेच्या विरोधात लढणार आहोत हा जो संदेश दिला, त्या संदेशाच्या मागे लोक उभे राहिल्याचेच कॉंग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्क्यावरुन स्पष्ट झाले आहे, म्हणूनच हा निकाल देशाला दिशादर्शक आहे. आज भाजप सर्वच राज्यांमध्ये सत्तेचा गैरवापर करून विरोधी सरकारे अस्थिर करीत आहे. तपास यंत्रणांची भीती दाखवून जबरदस्तीने आणि घाऊक पक्षांतरे घडविली जात आहेत. संवैधानिक संस्थांना बटिक बनविले जात आहे, अशा काळात विरोधी पक्षांच्या एकीचे जे प्रयत्न सुरु आहेत, त्या प्रयत्नांना कर्नाटकचा निकाल बळ देणारा आहे. ठामपणे उभे राहिल्यास मोदी शहांना हरविता येते हाच कर्नाटकचा सांगावा आहे. आता हा सांगावा भाजपेतर पक्ष देशभरात कसा पोहोचवितात त्यावर देशाच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.

Advertisement

Advertisement