Advertisement

‘सिल्व्हर ओक’वरील महाविकास आघाडीच्या बैठकीत काय चर्चा झाली?

प्रजापत्र | Sunday, 14/05/2023
बातमी शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत आणि अन्य महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

 

या बैठकीनंतर महाविकास आघाडीची एकत्ररित्या पत्रकार परिषद झाली. यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेविषयी जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, “कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला. महाविकास आघाडीच्या बैठकीत निवडणुकींचा आढावा घेतला. यात भ्रष्टाचार विविध, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि स्थानिक दृष्ट्या जनतेला त्या सरकारचा आलेल्या अनुभवांचा आढावा घेण्यात आला.”

“महाविकास आघाडी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील निकालाची तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी चर्चा केली. उन्हाळा असल्याने महाविकास आघाडीच्या सभा थोड्याशा प्रलंबित ठेवल्या आहेत. पावसाचे वातावरण पाहून सभा सुरु करणार आहोत. तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि आमच्या आघाडीतील अन्य पक्षांशी चर्चा करून लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी जागांबाबत प्रमुख एकत्र बसत निर्णय घेणार आहोत,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

 

“महाराष्ट्रातील जनतेला ठाम पर्याय सक्षमपणे देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल. महाविकास आघाडी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून मोठ्या अधिक ताकदीने पुढील काळात काम करेन,” असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Advertisement

Advertisement