Advertisement

कर्नाटकात दोन नाही, चारजण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

प्रजापत्र | Sunday, 14/05/2023
बातमी शेअर करा

कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाले असून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, कर्नाटकात अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाही. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आणखी दोघांची नावे चर्चेत असल्याची माहिती काँग्रेसचे कर्नाटकातील कार्यकारी अध्यक्ष रामालिंगा रेड्डी यांनी दिली. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

“प्रत्येक पक्षात महत्त्वाकांक्षी नेते असतात. मुख्यमंत्री पदासाठी फक्त डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्याच नाही तर एमबी पाटील आणि परमेश्वरा देखील इच्छुक आहेत. परंतु, यापैकी कोणीतरी एकच मुख्यमंत्री होईल. याचे अधिकार हायकमांडकडे असून आमदारांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाणार आहे. मला मंत्रीपद मिळू शकेल”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस कर्नाटकचे कार्यकारी अध्यक्ष रामलिंगा रेड्डी यांनी दिली.

दरम्यान, कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या काँग्रेसला मिळणार असल्या तरीही मुख्यमंत्री पदासाठी चूरस वाढली आहे. काँग्रेसने कर्नाटकात चांगला जोर लावला होता. त्यावेळी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा विचार नंतर करू, आधी निवडणूक लढवूया असं हायकमांडला कळवलं होतं. तसंच, मुख्यमंत्री पदाचा निर्णय हायकमांडच घेतील, असंही ठरलं होतं. त्यानुसार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विजेत्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी शर्यतीत असणाऱ्यांवर चर्चा होणार आहे. आमदारांसोबत चर्चा केल्यानंतरच मल्लिकार्जुन निर्णय घेतील.

याबाबत माहिती देताना कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सांगितलं की, “बंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये संध्याकाळी ६ वाजता ही बैठक होणार आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींवर सोपवतील असं दिसतंय. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आज (१४ मे) होण्याची शक्यता तशी कमी आहे. परंतु सर्व आमदारांचं मत पक्षश्रेष्ठी जाणून घेतील.”

सिद्धरामय्या आणि डि. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी खरी लढत आहे. या दोघांच्याही समर्थकांनी आता पोस्टरवॉर सुरू केले आहे. दोघांच्या समर्थकांनी घराबाहेर भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लावले आहेत.

Advertisement

Advertisement