मुंबई - राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे. अकोला येथे राज्यातील सर्वाधिक तापमान 45.6 अंश नोंदवले गेले आहे. याशिवाय धुळे, परभणी वर्धा येथेही तापमान 43 अंशांच्या पुढे गेले आहे.
विदर्भासह राज्यात रविवारी (ता.14) देखील उष्णतेची लाट रहाणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांनाही चांगलाच त्रास सहन करावा लागत असून उष्माघातामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेत छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एक-एक तर नाशिक जिल्हयात दोन बळी गेले. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
चक्रीवादळ आज बांगलादेश, म्यानमारला धडकणार
दुसरीकडे, बंगालच्या उपसागरातील अतितीव्र ‘मोचा’ चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारकडे झेपावत आहे. आज (ता. 14) दुपारपर्यंत हे चक्रीवादळ दक्षिण बांगलादेश आणि उत्तर म्यानमारच्या किनाऱ्यावर असलेल्या सिटवेजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व किनारपट्टीपासून दूर जात असलेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर प्रभाव जाणवणार नाही.
माणसांसह जनावरांनाही त्रास
राज्यात कमाल तापमानाचा पारा हंगामातील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. उन्हाच्या झळांनी अंगाची लाही लाही होत आहे. याचा केवळ नागरिकांनाच त्रास होत नसून पिके, ऊस, फळबागाही करपू लागल्या आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढून, जमिनीतील ओलावा कमी होत उन्हाळी पिकांना पाण्याचा ताण बसू लागला आहे. उन्हाच्या झळामुळे माणसांसह, जनावरे व कोंबड्यांनाही उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे. आज (ता. १४) राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याबरोबरच, दमट आणि उष्ण हवामान अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता
‘मोचा’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ईशान्य भारतातील त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, मणिपूर, पूर्व अरुणाचल प्रदेश व दक्षिण आसाम राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्र खवळून उंच लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.