परभणी - सोनपेठ तालुक्यातील भाऊचातांडा शेत शिवारात मारोती दगडु राठोड यांच्या आखाड्यावर सेप्टिक टँक सफाईचे काम करताना गुरुवारी ( दि ११) रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान गुदमरुन पाच मजुरांचा मृत्यू झाला. तर एका मजुराची प्रकृती गंभीर आहे. हे सर्व मजूर एकाच कुटुंबातील असल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शेतशिवारात मारोती राठोड यांचे शेत आहे. या शेतात त्यांचे फार्महाऊस आहे. येथील सेप्टिक टँकची सफाई करण्यासाठी विठ्ठल राठोड यांनी सोनपेठ शहरातील सफाई कामगारांना बोलवले होते. गुरुवारी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान सहा मजूर फार्महाऊस वर हजर झाले. सफाई सुरू असताना रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान एकजण टँकमध्ये बेशुद्ध पडला. त्याला वाचविण्यासाठी एकेक करून इतर पाच जण आत गेले. मात्र कोणीच बाहेर येत नसल्याने बाहेरील एकाने आरडाओरडा केला. राठोड तिथे आले पण तोपर्यंत उशीर झाला होता. माहिती मिळताच सोनपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने टँकवरीस स्लॅब फोडण्यात आला. त्यानंतर गुदमरून बेशुद्ध झालेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले. मात्र यातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर एका मजुराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर परळी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांची नावे :
१) शेख सादेक वय ४५
२) मुलगा : शेख शाहरुख वय २०
३) जावई : शेख जुनेद वय २९
४) भाऊ : शेख नविद वय २५
५) चुलतभाऊ : शेख फिरोज वय १९
६) जखमी: शेख साबेर वय १८