Advertisement

आमच्या परिचारिका आमचे भविष्य..

प्रजापत्र | Friday, 12/05/2023
बातमी शेअर करा

व्यक्तीचे आरोग्य चांगले राखणे हेच परिचारिकेचे मुख्य ध्येय होय व हे ध्येय सफल करण्यासाठी त्या आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. परिचारिका या आरोग्य सेवेतील एक महत्त्वाचा घटक आहे. रुग्णाचे संगोपन करणे, संवर्धन करणे, पोषण करणे, तसेच त्यांना शिक्षण देण्याचे कार्य परिचारिका करतात. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय धाराशिव येथील अंकित सवई यांनी घेतलेला हा लेखाजोखा.

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन 2023

International Nurses Day 2023 Theam:

Our Nurses. Our Future.

आमच्या परिचारिका आमचे भविष्य

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

परिचारिकांचा कोरोना साथीच्या आजाराने त्रस्त झालेल्या लोकांच्या उपचारात महत्त्वाचा वाटा आहेच. त्याच बरोबर परिचारिकांच्या धैर्याबद्दल आणि त्यांच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल, कार्याचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा (International Nurses Day 2023) केला जातो.

12 मे : परिचारिकांच्या योगदानाचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आज (12 मे) आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. जानेवारी 1974 मध्ये तो आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल (Florence Nightingale) यांच्या जन्मदिनी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. डॉक्टरांसोबतच आजारी रुग्णांच्या उपचारात पूर्ण सहकार्य करणाऱ्या परिचारिकांचाही कोरोना साथीच्या आजाराने त्रस्त झालेल्या लोकांच्या उपचारात महत्त्वाचा वाटा आहे. परिचारिकांच्या धैर्याबद्दल आणि त्यांच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल, कार्याचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा (International Nurses Day 2023) केला जातो.

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचा इतिहास

दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्याचे कारण म्हणजे 12 मे रोजी फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस हा परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.1974 मध्ये, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्याची घोषणा आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेने केली. या खास निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केलं जातं. या दिवशी, नर्सेसच्या आंतरराष्ट्रीय परिषदेद्वारे परिचारिकांना किटचे वाटप केले जाते. त्यात त्यांच्या कामाशी संबंधित साहित्य असते. परिचारिकांचे योगदान आणि सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय आरोग्य सेवा अपूर्ण आहेत.

 

फ्लोरेन्स नाईटिंगेल इतिहास :

12 मे 1820 रोजी इटलीच्या फ्लोरेन्समध्ये विल्यम नाईटिंगेल आणि फेनी यांच्या घरात फ्लोरेन्स यांचा जन्म झाला. सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या फ्लोरेन्स यांचं पालनपोषण इंग्लंडमध्ये झालं. त्यांना वयाच्या 16 वर्षी जाणीव झाली की आपला जन्म सेवेसाठी झाला आहे. गणित, विज्ञान आणि इतिहासात निपुण असलेल्या फ्लोरेन्स यांना नर्स बनायचं होतं. रुग्ण, गरीब आणि पीडितांची त्यांना मदत करायची होती. परंतु वडील त्यांच्या इच्छेच्या विरोधात होते. कारण त्यावेळी नर्स पेशाकडे सन्मानाने पाहिलं जात नसे. फ्लोरेन्स यांनी आपली जिद्द कायम ठेवली आणि 1851 मध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. 1853 मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय सुरु केलं. 1854 मध्ये क्रीमियाचं युद्ध झालं तेव्हा ब्रिटीश सैनिकांना रशियातील क्रीमियामध्ये लढण्यासाठी पाठवलं होतं. ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्कीचं युद्ध रशियासोबत होतं. युद्धात सैनिक जखमी झाल्याचं आणि मृत पावल्याचं वृत्त समजताच फ्लोरेन्स परिचारिकांचं पथक घेऊन तिथे पोहोचल्या. परिस्थिती अतिशय बिकट होती. अस्वच्छता, दुर्गंधी, साधनांचा तुटवडा, पिण्याचं पाणी नसल्याने आजार वेगाने वाढला आणि प्रादुर्भावामुळे सैनिकांचा मृत्यू झाला. फ्लोरेन्स यांनी रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासोबतच रुग्णांच्या आंघोळीकडे, खाण्यापिण्याकडे, जखमींच्या ड्रेसिंगवर लक्ष दिलं. यामुळे सैनिकांच्या परिस्थितीत अतिशय सुधारणा झाली. युद्धकाळात फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी जखमी आणि आजारी सैनिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र एकत्र केले. सैनिकांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला त्या पत्र पाठवत असत. रात्रीच्या वेळी हातात लालटेन घेऊन त्या रुग्णांची विचारपूस करत असत, त्यांची देखभाल करायच्या. यामुळे सैनिक प्रेम आणि आदराने त्यांना 'लेडी विद लॅम्प' म्हणायचे. 1856 मध्ये युद्धानंतर परतल्यानंतर याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.

13 ऑगस्ट, 1919 रोजी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचं निधन झालं.

परिचारिका

आपल्याला 'नर्स' म्हटलं की शब्द कळतो मात्र परिचारिका म्हटल्यानंतर आपण गडबडून जातो. थोडक्यात परिचारिका म्हणजे डॉक्टर रुग्णांना औषधोपचार देत असतात मात्र ते औषध उपचार वेळच्या वेळी देणे, रुग्णांची काळजी घेणे, रुग्णांची स्वच्छता ठेवणे हे ज्या व्यक्ती काम करतात त्यांना परिचारिका म्हणतात. नर्स हा लॅटिन शब्द Nurture, Nutricious यापासून आलेला आहे. या दोहोंचा शब्दशः अर्थ पाहिला तर रक्षण करणे, उत्तेजन देणे, वाढविणे किंवा शक्ती वाचविणे असा होतो. थोडक्यात गरजवंतांचे संगोपन करणे, संवर्धन करणे, पोषण करणे, तसेच त्यांना शिक्षण देण्याचे कार्य जी व्यक्ती करते तिला परिचारिका असे म्हणतात.परिचर्या करणाऱ्या व्यक्तीस परिचारिका असे म्हणतात.

आजारी व म्हाताऱ्या माणसांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीस परिचारिका (Nurse) हे नाव केव्हा मिळाले याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. परंतु ही संज्ञा पूर्वीपासून वापरण्यात येत असावी असे दिसते.

एखाद्या व्यक्तीच्या वेदना जाणून घेऊन त्याची वेदनापासून मुक्तता करणारी, त्याला इतर सांसर्गिक आजारांपासून दूर ठेवणारी, तसेच हसतमुखाने आपल्याकडून होईल ती मदत करणारी व त्यांच्यापुढे आपला आदर्श ठेवून जी व्यक्ती वागते तिला परिचारिका असे म्हणतात.

आजची परिचारिका ही आरोग्याची रक्षक, शिक्षक, मार्गदर्शक व आशेची खूण आहे.

परिचारिका असा शब्द उच्चारल्याबरोबर रुग्णांची अहोरात्र मेहनत करून सेवा करणारी, रुग्णांना धीर देणारी व त्यांचे मनोबल उंचावणारी, रुग्णाच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनून आरोग्याची काळजी घेणारी स्त्री आपल्यासमोर उभी राहाते. या कोरोनाकाळात (Corona) तर परिचारिका रुग्णांची सेवा करण्यासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या कुटुंबाला दुर्लक्षित करून सेवा देत आहेत. त्यामुळे परिचारिका (International nurses day) करीत असलेली मानवतेची सेवा नेहमीच आदरास पात्र ठरली आहे.

 

परिचारिका यांचे महत्त्व काही मुद्द्यांच्या माध्यमातून परिचारिका किती महत्वाचे कार्य करतात याची जाणीव करुन देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.

1 रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आपण पाहतो हॉस्पिटल मध्ये जे रुग्ण भरती होतात त्यांना विविध प्रकारच्या आजार असतात काहीना संसर्गजन्य आजार देखील असतात काहींची मोठमोठ्या opration असतात तर काही अपघातामध्ये इतके जखमी होतात की त्यांच्याकडे पाहण्याची देखील हिंमत होत नाही. काही किळस असणाऱ्या घटना असतात पण तरीदेखील नर्स रुग्ण म्हणजे आमच्यासाठी ईश्वर आहे असे म्हणून कार्य करतात.

2. सकारात्मक वातावरण रुग्णाच्या वेळी हॉस्पिटलमध्ये जातो यावेळी त्याला झालेल्या आजारपणामुळे तो घाबरलेल्या अवस्थेत असतो. डॉक्टर येतात इंजेक्शन, औषधे देतात आणि निघून जातात. ते जास्त वेळ रुग्णजवळ राहू शकत नाही, कारण त्यांना अनेक रुग्ण तपासायचे असतात; पण अशावेळी नर्सेस मात्र त्या रुग्णाची एखाद्या नातेवाईका प्रमाणे विचारपूस करत असतात आणि आजारपणातून तुम्ही लवकर बरे व्हाल असा एक आशावाद निर्माण करत असतात.

3. नियमित औषधोपचार डॉक्टरांनी औषधे किंवा इंजेक्शने Recomend केलेली आहेत, ती वेळच्या वेळी देण्याचे काम नर्सेस करत असतात. तसेच रुग्णाची प्रगती कशी आहे ? ती डॉक्टरांना माहिती पुरवतात. 

4. लसीकरण मोहिमेत हातभार आज वर्तमानातील उदाहरण द्यायचे झाले. तर या कोरोना महामारी ने अवघ्या मानवजातीला एका भयग्रस्त मानसिकतेत नेण्याचे काम केले होते. या साथीच्या आजारात अनेक तरुण, तरुणी तसेच वयोवृद्ध लोक मृत्युमुखी पडले. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी यावर एकच उपाय होता तो म्हणजे लसीकरण आणि या लसीकरणाची जबाबदारी त्यांनी पार पाडली त्या होत्या नर्सेस. आज पोलिओ हद्दपार झालाय अनेक साथीचे आजार हद्दपार होत आहेत ते केवळ लसीकरणामुळे. दुर्गम भागात जाण्यासाठी वाहनांची सोय नसताना या परिचारिका आपल्या कर्तव्य धर्माचे पालन करून लसीकरण मोहिमांमध्ये सहभाग घेतात व या मोहिमा यशस्वी करून दाखवीतात.

5. दुर्गम भागात आरोग्य सेवा एखादा भाग कितीही दुर्गम,जंगलाचा असला तरी त्या भागामध्ये शासकीय दवाखाने असतातच. अशा दुर्गम भागात राहणे धोक्याचे असून देखील परिचारिका दुर्गम भागात लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना औषधोपचार मिळावा यासाठी कार्य बजावताना दिसतात.

6. सेवेच्या मानाने मोबदला कमी आज आपण पाहतो सरकारी दवाखान्यांमध्ये काम करणाऱ्या परिचारिका या बारा बारा तास ड्युटी करतात. तरीदेखील त्यांना मिळणारा मोबदला अतिशय कमी असतो. खाजगी क्षेत्रात तर बोलायलाच नको जेवढे काम त्या करतात तेवढा मोबदला देखील त्यांना मिळत नाही असे सगळे चित्र पाहायला मिळते. म्हणून नर्सेस आपला सेवा धर्म नीट निभावत नाहीत असे नाही तर त्या इमाणे इतबारे रुग्ण सेवा करत असतात.

7.डॉक्टरांना मदत डॉक्टरांच्या पुढे अनेक रुग्ण येतात.या शेकडो किंवा हजारो रुग्णांना एक डॉक्टर कसे उपचार करणार? यावेळी डॉक्टरांना या उपचार कार्यात 24 तास सेवा देण्याचे काम परिचारिका करतात. थोडक्यात डॉक्टरांच्या मदतनीस आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

परिचर्येचे ध्येय व उद्देश (Aim and Objectives of Nursing)

• आरोग्य म्हणजे आजार किंवा पगुत्त्व (व्यग) यापासून मुक्त असणे असे नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य लाभणे यालाच आरोग्य म्हणतात. म्हणजेच माणूस शरीराने व मनाने सुदृढ व निरोगी असणे होय. अशा तऱ्हेने प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राखणे हेच परिचारिकेचे मुख्य ध्येय होय व हे ध्येय सफल करण्यासाठी तिला खालील उद्देश सतत डोळ्यासमोर ठेवावे लागतात.

उद्देश (Objectives)

१. रोगाचा प्रतिबंध करणे : सांसर्गिक व साथीच्या रोगापासून व्यक्तीचे संरक्षण करणे. उदा. पूर्वी आपल्या देशात देवीसारख्या रोगाच्या साथीने अनेक लोकांचे बळी जात.. परंतु हल्ली आपणाला देवीचा रुग्ण पाहायलासुद्धा मिळत नाही. सद्यस्थितीत धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकल्याविरुद्ध ट्रिपल व्हॅक्सिन देतात. क्षयरोग प्रतिबंधक बी. सी. जी. व विषमज्वराविरुद्ध टी. ए. बी. ही लस देऊन प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करून तिचे त्या रोगापासून संरक्षण करतात.

२. शुश्रुषा करणे :

(अ) आपल्याला मोजता येणार नाहीत इतक्या प्रकारचे आजार आता आपणास ऐकून व पाहून माहीत आहेत. या आजाराने जर्जर झालेल्या, पछाडलेल्या रुग्णांचा आजार बरा होण्यासाठी त्यांची शुश्रुषा करणे व त्यांना त्या आजारातून मुक्त करणे.

(ब) पूर्वी बहुतांशी स्त्रियांची बाळंतपणे घरीच होत. परंतु आजकाल आपणास शिकण्यासाठी सुद्धा घरी बाळंतपण (Home Delivery) पाहावयास मिळत नाही. बाळंतपण हे काही आजारपण नव्हे, तर ती एक नैसर्गिक घटना (Natural Phenomena) आहे. गरोदर स्त्रिया दवाखान्यात आल्यानंतर त्यांची योग्य पद्धतीने सुटका करणे, आवश्यक वाटल्यास शस्त्रक्रिया करून त्यांची सुटका करणे व त्यांची व नवजात बालकांची शुश्रूषा करणे, काळजी घेणे, यामुळे आईचा व बाळाचाही विपरीत परिणामांपासून बचाव होतो.

(क) काही वृद्ध व्यक्तींना नैसर्गिक बदलामुळे वरचेवर शारीरिक व मानसिक त्रास होतो व त्यांची काळजी घरी घेणे अशक्य होते. अशांची रुग्णालयात शुश्रुषा करणे व काळजी घेणे हा दुसरा उद्देश झाला.

३. आजाऱ्यास विपरीत परिणाम (Complications) होऊ न देणे : कोणताही रुग्ण आपल्याकडे आल्यानंतर त्याची शुश्रूषा करताना त्याला दुसरा आजार होऊ न देणे किंवा झालेल्या आजारामुळे त्याला व्यंग किंवा विकृती निर्माण होऊ न देणे. उदा. पक्षाघाताच्या (Paralysis) रुग्णाचा कमरेपासून खालचा भाग लुळा पडलेला असतो. त्याच्या पायाची योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर फूट-ड्राप (Foot-Drop) ही विकृती निर्माण होते. ती होऊ नये म्हणून पायांना योग्य पद्धतीने मसाज दिला पाहिजे. योग्य त्या पद्धतीने त्यांची हालचाल केली पाहिजे. बिछान्यात ते योग्य स्थितीत ठेवले पाहिजेत. म्हणजेच रुग्णास विकृती किंवा व्यंग निर्माण होऊ न देणे हा एक मुख्य उद्देश आहे.

४. रुग्णाचे पुनर्वसन करणे (Rehabilitation) याचे स्पष्टीकरण आपल्याला दोन प्रकारे करता येईल.

(अ) एखादा रुग्ण आजाराने किंवा कोणत्याही कारणाने पंगू झाल्यास त्याला व त्याच्या कुटुंबियांना पूर्ववत आयुष्य जगण्यासाठी योग्य ती मदत करून रुग्णास व्यवसाय प्राप्त करून देणे यालाच पुनर्वसन असे म्हणतात.

(ब) एखादा रुग्ण मानसिक अथवा शारीरिक आजारामुळे अगर अपघातामुळे पूर्वीच्या व्यवस्थित जीवनाला मुकलेला असेल तर त्याला योग्य तो मार्ग दाखवून, शक्य ती मदत करून, , जास्तीत जास्त पूर्वीसारखे जीवन जगण्यास मदत करणे यालाच रुग्णाचे पुनर्वसन करणे असे म्हणतात.

 एखादी व्यक्ती कोणत्याही कारणाने जर पंगू झाली तर तिची अवस्था फार दयनीय होते. तो बेकार झाल्यामुळे त्याची जबाबदारी त्याच्या कुटुंबियांची जबाबदारी समाजावर व पर्यायाने देशावर, राष्ट्रावर पडते. म्हणूनच त्या व्यक्तीला स्वतःचे दैनंदिन कार्यक्रम स्वतः करण्यासाठी, स्वतः थोडेफार मिळविण्यासाठी समर्थ करणे आवश्यक आहे व ते अगदी सुरुवातीपासून रुग्णालयातून घरी पाठविण्यापूर्वी पूर्ण करणे ही परिचारिकेची जबाबदारी आहे. उदा. १) एखाद्या व्यक्तीचे अपघातामध्ये पाय गेले असतील व तो टेलरिंग काम करणारा असेल, तोच कुटुंबातील कर्ता असेल तर त्याच्याबरोबर त्याचे कुटुंबही निराधार बनते. असे होऊ नये म्हणून त्याला मानसिक व शारीरिकदृष्ट्या बळकट केले पाहिजे. त्याच्या हातांना हाताचे व पायाचेही काम करावे लागणार आहे. म्हणून योग्य त्या पद्धतीने व्यायाम देऊन हातामध्ये जास्तीत-जास्त ताकद निर्माण केली पाहिजे व त्याला पायमशीन मिळवून दिले पाहिजे. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त पूर्वीसारखे सुरळीत जीवन जगता येईल.

उदा. २) पोलिओमध्ये किंवा अपघातामध्ये पाय गेलेल्या अशिक्षित कामगाराला पूर्वीचे कष्टाचे काम करता येणार नाही. परंतु त्याच्यासाठी निरनिराळ्या संस्थांची मदत घेऊन तीन चाकी सायकल मिळवून देऊन, अंडी, पाव घरपोच करणे, पेपर विकणे किंवा कोणत्याही कारखान्यात बैठे काम करण्याची नोकरी मिळवून द्यावी.

● हे सर्व करण्यासाठी आपल्याला फिजिओथेरपी संस्था, ऑक्युपेशनल थेरपी संस्था, समाजकल्याण संस्था या सर्वांची मदत घ्यावी लागते.

4. संशोधन (Research) : कोणत्याही व्यवसायामध्ये संशोधन हे अत्यावश्यक आहे. कारण संशोधनामुळे व्यवसायाची प्रतिष्ठा वाढते. समस्या शोधून काढता येतात. समस्या सोडविण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करता येतात. ज्ञान वाढविता येते, तसेच कोणत्याही प्रकारची समस्या सोडविण्याच्या कृतीला या संशोधनामुळे मार्गदर्शन मिळते.

सेवा हा ज्यांचा धर्म I

रुग्णाचे हसू तोच हाच यांचा मोबदला I

अशी ज्या करतात सेवा I

वाटावा सर्वांना त्यांच्या चांगुलपणाचा हेवा I

अशा या परिचरकांचा सर्वांकडून गुणगौरव व्हावा I

चला तर मग यावर्षी आपण देखील जोरदार परिचारिका दिन साजरा करूया.व परिचारिका यांच्या आनंदात सहभागी होऊया.

लेखन संकलन

श्री अंकिज पांडुरंग सवाई

Education_

MBA(Hospital & Health care Management),

MBA(HR),

MA(Sociology),BA,

PBBSc(Nursing),DNA(PC),

DCCN(PC), PGDNYS,RGNM, CHCWM,ND.... Work_ STAFF NURSE Government Medical College *DHARASHIV E-mail_ [email protected] 7387119000/8668607326

Advertisement

Advertisement