बीड दि. ९ (प्रतिनिधी ) : एकीकडे केंद्र सरकारने पीएमकीसान योजनेतील अनुदानाची रक्कम वाढविली असली तरी त्यासाठी केवायसीची आत घातली आहे. मात्र बीड जिल्ह्यासह राज्यातच केवायसीचे प्रमाण कमी आहे. आजपर्यंत ७१ % शेतकऱ्यांनीच केवायसी केली आहे. त्यामुळे त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा चौदावा हप्ता मिळणार आहे. यात बीड जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आज दिसत आहे .
केंद्र सरकारने पीएमकीसान योजनेतून शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रतिमाह अनुदान देण्याची योजना जाहीर केली होती. त्यात आता वाढ केली आहे. तसेच केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या १३ हप्त्यांचे वितरण आतापर्यंत झाले असून आता चौदावा हप्ता दिला जाणार आहे. मात्र हा हप्ता देण्यापूर्वी सर्व लाभधारक शेतकऱ्यांचे केवायसी करून घेण्याचे निर्देश सरकारने दिले होते. यात शेतकऱ्यांचे आधार आणि जमिनीची माहिती ऑनलाईन नोंदविणे आवश्यक होते. मात्र राज्यातच याबाबतीत उदासीनता असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यात या केवायसीचे काम ६९ % इतके झाले आहे. त्यामुळे आता त्याच शेतकऱ्यांना चौदावा हप्ता मिळणार आहे. केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांची जिल्ह्यातील संख्या १ लाख ३२ हजार ४८ इतकी आहे. आता हे शेतकरी चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहतील.
आकडे बोलतात
नोंदणीकृत शेतकरी : ५ लाख २८ हजार ३
पात्र शेतकरी : ४ लाख २७ हजार ९२७
आधार आणि जमीन नोंद झालेले शेतकरी : २ लाख ९५ हजार ८७९
वंचित शेतकरी : १ लाख ३२ हजार ४८