काही दिवसांपूर्वी ज्या महाविकास आघाडीला वज्रमूठ म्हटले जात होते, त्याच आघाडीमधील घटकपक्षांमध्ये सध्या जे सुंदोपसुंदीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि सर्वच पक्षांचे नेते परस्परांवर ज्या पद्धतीने आरोपांची राळ उडवत आहेत, ते पाहता आघाडीमध्ये बिघाडी निर्माण करण्याचाच प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे का ? असे वाटत आहे. एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षांवरचा सर्वोच्च न्यायालयातील बहुप्रतिक्षित निकाल येत्या २-३ दिवसात येण्याची शक्यता असतानाच, सध्या विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची तोंडे मात्र वेगवेगळ्या दिशेला पाहायला मिळत आहेत. अगदी शरद पवार देखील याला अपवाद नसावेत याला काय म्हणायचे ?
राज्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पाडून भाजपने एकनाथ शिंदेंचे सरकार आणले तेव्हापासूनच महाराष्ट्रात राजकीय शिमगा सुरु झालेला आहे, तो अजूनही थांबायला तयार नाही. मागच्या काही काळापर्यंत महाविकास आघाडीचे आणि भाजप-शिंदे गटाचे लोक एकमेकांवर टीका करायचे. त्या टिकेला कोणताही धरबंध नव्हता. भाजपमधील राणे पितापुत्र असतील, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नाना पटोले, शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, उदय सामंत आणि शिवसेनेचे (उबाठा ) संजय राऊत, सुषमा अंधारे अशी वाचाळ नेत्यांची यादी फार मोठी करता येईल. हे लोक एकमेकांवर टीका करताना राजकारणचा पुरता शिमगा करीत होतेच. मात्र हे होत असताना महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा-शिंदे सेना गट असे चित्र होते. मागच्या काही काळात मात्र महाविकास आघाडीमधील नेतेच एकमेकांवर टीका करीत आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील नेत्यांनाच ही आघाडी जुलमाची वाटते आहे काय? आणि आता आघाडीमध्ये बिघाडीच करायची आहे का, असे वाटावे अशीच परिस्थिती आहे.
मुळात ज्या आघाडीची रचना शरद पवार यांच्यासारख्य नेत्याने केली, त्या पवारांनाच आता ही आघाडी टिकवायची इच्छा आहे का नाही, असाच प्रश्न पडत आहे. शरद पवारांनी आपल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीमध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीची चिरफाड म्हणा किंवा वस्त्रहरण केले ते ठाकरेंच्या सेनेला अपेक्षित नक्कीच नव्हते, आणि शरद पवार यांच्यासारखे राष्ट्रीय राजकारणात इतक्या वर्षाचा अनुभव असलेले नेते, हे विनाकारण किंवा निव्वळ प्रामाणिक राजकारण कथनाच्या हेतूने (आता या वयात कशाला लपवालपवी म्हणून) त्यांनी लिहून टाकले असेल असे नक्कीच म्हणता येणार नाही. राजकारणात कोणाच्या कोणत्या कृतीचा काय परिणाम होईल, याचा शरद पवारांइतका अंदाज कोणालाच येत नाही. तरीही पवारांनी ठाकरेंना आरसा दाखविला, तसेच काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली. आता ठाकरेंना आरसा दाखविल्याने लालेलाल झालेले संजय राऊत आपल्या मुखपत्रातून 'पवारांना इतक्या वर्षात आपला राजकीय वारस का निर्माण करता आला नाही?' असा सवाल विचारत आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये देखील जुंपली आहे. त्यातच काँग्रेसच्या काहींना ठाकरेंनी आपल्या सेनेत प्रवेश दिला, त्यामुळे नाना पटोले आगपाखड करीत आहेत, हे सारे कशाचे द्योतक आहे? दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी 'राऊतांनी असे का लिहावे ? त्यांना राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे वाटतेय का?' असा सवाल केला होता, त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या बिघाडीमध्ये काही वेगळे राजकारण तर शिजत नाही ना असा प्रश्न पडत आहे. नाटकात ज्यावेळी एखादे दृश्य घ्यायचे असते, त्या अगोदर तशी वातावरण निर्मिती करावी लागते. त्यामुळे आता महाराष्ट्रात आणि देशात, महाविकास आघाडीची मोट नेमकी कोणाला तरी नको आहे का? आणि फुटीचे खापर इतर कोणावर तरी फोडता यावे यासाठी वातावरण निर्मिती तर केली जात नाही ना? अशी शंका घ्यायला वाव असल्याचे चित्र सध्यातरी वाटत आहे. अगदी शरद पवारांसारखे नेते उद्धव ठाकरे किंवा पृथ्वीराज चव्हाणांवर थेट टीका करतात, त्यावेळी सर्वांनाच आघाडीचेए बंधन आता काचत तर नाही ना? आणि या वादातून काही नवीन तर घडवायचे नाही ना? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.