आशिया कप 2023 स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडून जाणार आहे. आशिया कप 2023 आता पाकिस्तानऐवजी दुसऱ्या देशात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. आशिया कप 2023 स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात येणार होतं. पण टीम इंडियाने स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यापासून माघार घेतल्यावर पाकिस्तानकडून आशिया कपचं यजमानपद जाणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशिया कप 2023 स्पर्धा आता पाकिस्तानऐवजी श्रीलंका होण्याची शक्यता आहे. तसेच आशिया कपसाठी युएईचं नावंही चर्चेत आहे.
भारताचा पाकिस्तानला मोठा झटका!
आशिया चषक 2023 पाकिस्तानच्या भूमीवर आयोजित करण्यासाठी उत्सुक असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) मोठा धक्का बसला आहे. पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया कप 2023 स्पर्धा पाकिस्तान बाहेर आयोजित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, आशिया कप पाकिस्तानऐवजी कोणत्या देशात आयोजित करण्यात येईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया कपचं आयोजन केलं जाऊ शकतं.
पाकिस्तानकडून आशिया कपचं यजमानपद जाणार
याआधी आशिया कप 2023 स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. पाकिस्तामध्ये पार पडणाऱ्या स्पर्धेला जाण्यास भारताने नकार दिला. यानंतरच पाकिस्तानच्या यजमानपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) आशिया चषक आपल्या देशात आयोजित करण्यासाठी आणि या स्पर्धेत भारतीय संघही सहभागी व्हावा यासाठी नवी 'हायब्रिड मॉडेल' योजनाही आखली होती. या योजनेनुसार, भारतीय क्रिकेट संघाला ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचीही गरज भासणार नव्हती. पण आता आशिया कप 2023 स्पर्धा पाकिस्तान होणार नसल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे.
इतर देशांनी नाकारलं 'हायब्रिड मॉडेल'
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने ठरवलेल्या हायब्रीड मॉडेलल इतर देशांनीही परवानगी नाकारली. भारताने यापूर्वीच पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत स्पर्धा पाकिस्तानात आणि भारतीय संघाचे सामने पाकिस्तानबाहेर हलवण्याचा पीसीबीचा प्रस्ताव भारतासह इतर देशांनी नाकारला. त्यानंतर आता आशिया कप 2023 चं आयोजनासाठी दुसऱ्या देशात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आशियाई क्रिकेट परिषदेकडून त्यासाठी विचारविनिमय सुरु आहे.
सप्टेंबर महिन्यात रंगणार आशिया कप स्पर्धा
आशिया चषक 2023 स्पर्धेच्या यजमानपदासाठी श्रीलंका आघाडीवर दिसत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) बैठकीत ठिकाणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सप्टेंबर महिन्यामध्ये आशिया कप 2023 स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे.