बीड दि.८ (प्रतिनिधी ): बीडच्या राजकारणात अल्पसंख्यांक जाती समूहातील असतानाही क्षीरसागर कुटुंब टिकले आणि राजकारणावर त्यांनी हुकूमत गाजविली, ती या कुटुंबाच्या लोकसंपर्काच्या जोरावर. दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर यांचा लोकसंपर्क हा अफाट म्हणावा असा होता. सामान्यांच्या सुख दुःखात काकू धावून जायच्या आणि काकूंच्या घरात जाताना सामान्यांना कधी अवघडल्यासारखे वाटायचे नाही. आज त्याच काकूंचा लोकसंपर्काचा वारसा घेऊन नेहा क्षीरसागर उतरल्याचे चित्र मागच्या काही काळात दिसत आहे. सामान्यांशी 'कनेक्ट ' वाढविण्यात त्यांना यश येत आहे.
राजकारणाचे स्वरूप कितीही बदलले आणि राजकारणाला कितीही व्यवसायिक स्वरूप आले तरी ,राजकारण टिकते आणि वाढते ते राजकारणी व्यक्तीच्या सामान्यांशी असलेल्या 'कनेक्ट 'च्याच जोरावर. बीडच्या क्षीरसागर कुटुंबात काकुंनातर त्यांच्या तिन्ही मुलांनी हा धागा पकडला होता,आणि पुढच्या पिढीत हे ओळखले संदीप क्षीरसागर यांनी. म्हणूनच संदीप क्षीरसागर यांच्या आमदार होण्यामागे या 'कनेक्ट 'चा वाटा साहजिकच फार मोठा राहिला. आजही लोक त्यांना सहज उपलब्ध कोण होते हे पाहत असतात. म्हणूनच आता हाच 'कनेक्ट ' वाढविण्याचे काम आ. संदीप क्षीरसागर यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर यांनी हाती घेतले आहे. आ. संदीप क्षीरसागर यांची आमदार होण्यापूर्वीची ओळख होती, ती कार्यकर्त्याच्या कोणत्याही प्रसंगात हजेरी लावण्याची. आता जेथे आ. संदीप क्षीरसागर यांना पोहचणे शक्य नसेल, तेथे नेहा क्षीरसागर जात आहेत. कोणते उदघाटन असेल, एखाद्या कार्यकर्त्याच्या घरातील कोणता सुखद अथवा दुःखद प्रसंग असेल , त्या ठिकाणी आ. संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिनिधी म्हणून जाताना नेहा क्षीरसागर दिसत आहेत. त्या ठिकाणी जाताना, कोठे मी तुमची सून आहे, कोठे लेक आहे, कोठे बहीण आहे असे नाते जोडत त्यांचा प्रवास सुरु झाला आहे. बीडकरांसाठी आणि आ. संदीप क्षीरसागरणाच्या कार्यकर्त्यांसाठी हे आश्वासक देखील आहे,.