जागतिक व्यापार आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांच्यादृष्टीने चांगली बातमी समोर आली आहे. भारतात आणखी एका राज्यात लिथियमचा साठा (Lithium Reserves) आढळला आहे. काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्येदेखील लिथियमचा साठा आढळला होता. आता, सापडलेला साठा काश्मीरमधील साठ्याच्या तुलनेत अधिक असल्याची माहिती भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (Geological Survey of India-GSI) या संस्थेने दिली आहे. राजस्थानमध्ये हा लिथियमचा साठा आढळला आहे.
IANS या वृत्तसंस्थेने GSI अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील नागौर भागात लिथियमचा साठा सापडला आहे. देशातील लिथियमची मागणी 80 टक्के पूर्ण होईल, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा आढळला आहे. आतापर्यंत भारत लिथियमसाठी चीनवर अवलंबून होता. आता, नव्याने साठा सापडल्याने लिथियमसाठी चीनवर असणारे अवलंबीत्व कमी होणार आहे. GSI च्या दाव्यानुसार, जर राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर लिथियमचा साठा असेल तर भारत चीनच्या वर्चस्वालादेखील धक्का देऊ शकतो. त्याशिवाय, 2030 पर्यंत कारमधून होणारे 30 टक्के कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने मोठे यश मिळू शकेल.
जम्मू-काश्मीरमध्ये 59 लाख टनचा साठा
जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) रियासी जिल्ह्यात हा लिथीयम मेटलचा साठा मिळाला आहे. हा साठा जवळपास 59 लाख टन इतका असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आली होती.
लिथियम महत्त्वाचा धातू का?
लिथियम हा जगातील सगळ्यात हलका आणि मऊ धातू आहे. लिथियममुळे केमिकल एनर्जीचे रुपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल फोन यांसारख्या उपकरणांसाठी बॅटरीच्या निर्मितीमध्ये लिथियम धातूचा वापर केला जातो. देशातील लिथियमची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते.
सध्या जगात लिथियमचे 47 टक्के उत्पादन हे ऑस्ट्रेलियात होते. तर, 30 टक्के उत्पादन चिलीमध्ये आणि 15 टक्के उत्पादन चीनमध्ये होते. आता, भारतात, जम्मू-काश्मीरनंतर राजस्थानमध्ये लिथियमचा साठा सापडल्याने भारताचे लिथियमसाठीचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
इलेक्ट्रिक वाहने उद्योगाला चालना मिळणार?
पर्यावरणपूरक आणि पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवरील अवलंबित्व करण्यासाठी भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जात आहे. मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढले आहे. तर, दुसरीकडे देशाता मोबाईल फोन निर्मितीचे कारखाने सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहे. चीनमध्ये कारखाने असणाऱ्या मोबाईल फोन कंपन्यांनी भारतात यावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता भारतात, लिथीयमचा साठा आढळल्याने इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल बॅटरी निर्मिती उद्योगाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.