Advertisement

अवकाळीचे सावट कायम तर काही भागात तापमान वाढीस सुरुवात

प्रजापत्र | Saturday, 06/05/2023
बातमी शेअर करा

राज्याच्या काही भागात अजूनही अवकाळी पावसाचे सावट कायम असले तरी काही भागात तापमान वाढीस सुरुवात झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात प्रचंड मोठे बदल होत आहे. गारपीटीसह होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सर्वसामान्य माणसाला देखील त्याचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरीही राज्याच्या काही भागात मात्र तापमान वाढीस सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला आहे. अवकाळी पावसाने उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी त्यानंतर तापणारे ऊन जास्त त्रासदायक ठरणार आहे.

 

 

चक्रीवादळाचा प्रवास कसा?
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या बऱ्याच हालचाली सुरु असल्यामुळे मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्याच्या मध्यापर्यंत पूर्व मान्सून परिस्थिती उदभवताना दिसणार आहे. पण, अद्यापही चक्रीवादळाच्या मार्गाबाबत साशंकता आहे. पाच मेपासून अंदमानच्या दक्षिणेकडे असणाऱ्या सागरी क्षेत्रामध्ये चक्रिवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सहा व सात मे पर्यंत हे वारे पुढील दिशेनने मार्गस्थ होतील.

 

आठ मे रोजी रात्रीच्या सुमारास हे चक्रीवादळ पूर्णपणे रौद्र रुपात येईल. पण, अद्यापही त्याची अंतिम दिशा कळू शकलेली नाही. ज्यामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि चेन्नईमधील यंत्रणा त्यावर लक्ष ठेवून आहेत.चक्रीवादळसदृश वाऱ्यांची निर्मिती होत असल्यामुळे या भागांमध्ये जोरदार पर्जन्यमानाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळ मध्य बंगलाच्या उपसागरापासून पुढे जाईल. दहा किंवा अकरा मे रोजी त्याचा मार्ग बदलेल.

येत्या काळात उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतामध्ये सकाळच्या वेळी असणाऱ्या तापमानात काही अंशांनी वाढ होणार आहे. तर, अंदमान- निकोबार बेट समूह आणि पंजाब, ओडिशा, छत्तीसगढ भागात मात्र पावसाची हजेरी असणार आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड इथंही पावसाची हजेरी असेल. तर, पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टीही होणार आहे.

Advertisement

Advertisement