Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - एक अंक संपला

प्रजापत्र | Saturday, 06/05/2023
बातमी शेअर करा

     एकमेकांना वगळून शरद पवार आणि राष्ट्रवादी हे समीकरण टिकणेच शक्य नव्हते, म्हणूनच शरद पवार यांनी जरी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून आपण निवृत्त होणार आहोत असे जाहीर केले होते, तरी कार्यकर्ते आणि बहुतांश नेते पवारांना तसे करु देतील असेही शक्य नव्हते, म्हणूनच पवारांना हा निर्णय बदलावा लागणार होताच, याची त्यांनाही कल्पना होतीच. फक्त या माध्यमातून पक्षावर आजही कोणाचे वर्चस्व आहे हा संदेश देऊन पवारांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. या खेळीच्या माध्यमातून शरद पवारांनी खऱ्या अर्थाने चेकमेट केले आहे ते अजित पवारांना, त्यामुळे आता शरद पवारांच्या राजीनामा नाट्याचा एक अंक संपला आहे, मात्र अजित नाट्य होणारच नाही असे कोणी सांगावे?

 

प्रादेशिक पक्ष म्हणून ज्यांची सुरुवात झाली, त्यांनी आपला विस्तार इतर आणखी राज्यांमध्ये केला तरी, त्या पक्षावर प्रभुत्व असते ते संस्थापकांचेच. किंबहुना पक्षाचे संस्थापक म्हणून जे कोणी असतात, त्यांच्या करिष्म्यावरच त्या पक्षाची चलती असते . राष्ट्रवादी पक्ष तरी त्याला अपवाद कसा असणार होता ? म्हणूनच 'लोक माझे सांगाती ' च्या प्रकाशनप्रसंगी शरद पवार यांनी जरी 'आपण राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले तरी तसे होणे शक्य नव्हते. ज्यावेळी शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली, त्याचवेळी, कार्यकर्त्यांना, नेत्यांना हे पचणार नाही आणि शरद पवार यांना हा निर्णय मागे घ्यावा लागणार हे स्पष्ट होते. बहुतांश नेत्यांची भावना हीच होती. अपवाद होता अजित पवारांचा . शरद पवारांच्या समक्ष एखादा नवा अध्यक्ष घडणार असेल तर तुम्हाला का नको आहे ? असा थेट सवाल करत अजित पवारांनी आपल्या मनात काय आहे याचे सूतोवाच केले होतेच.
अर्थात शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडणार असल्याची केलेली घोषणा इतरांसाठी आश्चर्य असेल, मात्र शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना ते माहित नव्हते असे नाही. किंबहुना, राष्ट्रवादी पक्षाची सूत्रे आता आपल्या हाती यावीत अशी अजित पवारांची असलेली इच्छा लपून राहिलेली नाही. आणि पक्षात सुप्रिया का अजित पवार हा वाद आहेच, हे देखील लपून राहिलेले नाही. अजित पवारांचे राज्यात नेटवर्क चांगले असले, तरी अजित पवारांची राजकीय धोरणे अनेकदा उथळ म्हणावी अशी असतात , शरद पवारांच्या निर्णयामध्ये गूढ असले तरी त्यात जो एक प्रकारचा पोक्तपणा आणि दूरदृष्टी असते, अजित पवार राजकीय निर्णयाच्या बाबतीत त्यांच्या पासंगाला देखील पुरत नाहीत हे देखील एकदा नव्हे अनेकदा समोर आलेले आहे. अजित पवार मध्येच गायब काय होतात, राजीनामा काय देतात, असंगाशी संग करायला देखील कसे तयार असतात आणि मुळात त्यांना आपला राग किंवा भावना लपविता कशा येत नाहीत हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीच्या हातात राष्ट्रवादीची धुरा गेली तर पक्ष कितपत एकसंघ राहील हे कोडेच आहे. हे सारे शरद पवारांना कळत नसेल असे नाही. मात्र शरद पवार कान टोचायची असले तरी ते स्वतः टोचत नाहीत, तर सोनारांकडूनच टोचून घेतात. म्हणूनच मागच्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीमधला जो अंतर्गत संघर्ष सुरु आहे, त्या संघर्षाबाबत देखील पक्ष नेमका कोणाचा आहे हे दाखवून देणे जे आवश्यक होते , त्याची योग्य वेळ शरद पवारांनी साधली आहे. राष्ट्रवादीचे नेते आपल्याशिवाय पक्षाचा विचार करूच शकत नाहीत हे शरद पवारांना चांगले माहित होते, त्यांना याची जाणीव करून द्यायची होती , ती अजित पवारांना आणि अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला आपल्यासोबत सहज घेता येईल अशी स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला . शरद पवारांना बायपास करून राष्ट्रवादीमध्ये तरी काही करता येणार नाही हेच शरद पवारांनी मागच्या २ दिवसात दाखवून दिले. प्रत्येक नेता , शरद पवारांना ज्या पद्धतीने 'तुम्हाला अशा कठीण काळात पक्षाची जबाबदारी सोडता येणार नाही ' असे सांगत होता आणि तेही अजित पवारांच्या समक्ष - ते नेते आणि कार्यकर्त्यांवर कितीही डाफरत असले तरी - अजित पवारांना काय वाटेल याचा विचार न करता , ठोस भूमिका घेत होता, त्यावरूनच अजित पवारांच्या कलाने हा पक्ष चालणार नाही, तसे झाले तर पक्ष एकसंघ राहणार नाही, हेच शरद पवारांनी दाखवून दिले. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घेणे क्रमप्राप्त होते. तसे झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील नात्याचा एक अंक संपला आहे.
मात्र शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला असला म्हणजे राष्ट्रवादीमधील वर्चस्वाची लढाई संपली असे म्हणता येणार नाही. पुढचा आठवडा राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणार आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेतच. अजित पवारांना सोबत घेऊन राष्ट्रवादीची शिवसेना करण्याचा प्रयत्न भाजप करणारच नाही असेही नाही, मात्र आता अजित पवारांनी वेगळी भूमिका घेऊ केली तर त्यांच्यासोबत किती लोक असतील हे पाहणे महत्वाचे ठरेल. शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे, मात्र आता पुन्हा अजित नाट्याचा अंक सुरु होणारच नाही असे नाही. आणि ते नाट्य झालेच, तर ते राष्ट्रवादीला आणि राज्यालाही कोणत्या दिशेने घेऊन जाईल हे मात्र काळच ठरवेल.

Advertisement

Advertisement