एका बाहुबली खासदारावर महिला पैलवानाच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्याने दाखल करावा लागल्यानंतरही त्याला अटक तर होतच नाही, उलट त्याच्या विरोधात धरणे देत असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त खेळाडूंनाच मारहाण होते.मध्यरात्री पोलीस महिला खेळाडूंसोबत दुर्वर्तन करतात, आणि या'हीच वागणूक देणार असाल तर आम्हाला दिलेली पदके परत घ्या ' म्हणत महिला खेळाडूंना मध्यरात्री रडावे लागत असेल तर देश नेमका कोणत्या दिशेने जात आहे? एक साधा बाहुबली खासदार साऱ्या सत्तेला स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवतोय आणि देशाचा सन्मान असणाऱ्या देशाच्या लेकी दिल्लीत अश्रू ढाळतायत , याची कसलीच लाज केंद्रित सत्तेला वाटत नाही.
भारतीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष असलेला भाजपचा खासदार ब्रिजभूषण सिंह याच्या विरोधात धरणे देत असलेल्या महिला कुस्तीपटू आणि इतर खेळाडूंना मध्यरात्री दिल्ली पोलिसांनी केलेली धक्काबुक्की ही सत्ता किती दडपशाही करू शकते हे दाखविणारी होती. विनेश फोगाट आणि इतर खेळाडू मागच्या बारा दिवसांपासून जन्त्रमंत्रावर आंदोलन करीत आहेत, मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालय किंवा पंतप्रधान कार्यालयाला याची दखल घ्यावी वाटत नाही. एरव्ही कोणत्याही खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदक जिंकल्यावर 'हे सारे कसे मोदींमुळेच होत आहे ' असे भासविणारी सत्ता आता त्याच महिला खेळाडूंना न्याय देण्यासाठी एक इंच देखील हलायला तयार नाही . मुळात ब्रिजभूषण सिंह सारख्या बाहुबली खासदारापुढे सर्वशक्तिमान केंद्रीय सत्तेने हतबल व्हावे इतक्या सत्तेच्या कोणत्या नद्या या ब्रिजभूषणकडे आहेत ?
देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवून देणारे खेळाडू ज्यावेळी एखाद्यावर आरोप करतात त्यावेळी खरेतर केंद्रीय सत्तेने याची गंभीर दखल घ्यायला हवी होपती. सरकारने नाही म्हणायला समिती नेमली, मात्र त्याच्या अध्यक्ष असलेल्या पी टी उषा खेळाडूंनाच शिस्त शिकवून गेल्या.अकहर सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्याने दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषांवर गुन्हे तर दासखल केले, मात्र इतक्या गंभीर प्रकरणात त्याला अटक करावी असे दिल्ली पोलिसांना वाटत नाही आणि 'बेटी बचाव ' ची घोषणा करणारे पंतप्रधान यावर 'मन कि बात' करू शकत नाहीत हे देसधाचे दुर्दैव.
ज्या खेळाडूंचे देशासाठी मोठे योगदान आहे, त्यांनी धरणे दिल्यानंतर पावसात परिसर ओला झाला म्हणून जर खाटा मागविल्या तर त्यांना त्या देखील आणू दिल्या जात नाहीत. आता या खाटा आम आदमी पक्षाचे एक मंत्री घेऊन आले होते असा दावा दिल्ली पोलीस करीत आहेत, मात्र खाटा कोणीही आणून दिल्या तर दिल्ली पोलिसांना त्यात हरकत वाटावी असे काय होते ? आपण किती निर्घृण वागू शकतो याचेच प्रदर्शन दिल्ली पोलीस करीत आहेत. मध्यरात्रीच्या वेळेस महिला खेळाडूंसोबत पोलीस दुर्वर्तन करतात, जखमी खेळाडूंना वेळेत दवाखान्यात पाठविले जात नाही, त्यांची विचारपूस करायला आलेय मंत्र्यांना ताब्यात घेतले जाते, म्हणजे पोलिसांना नेमके काय सध्याचे आहे? कसेही करून या खेळाडूंचे आंदोलन दडपायचे , मोडून काढायचे असा विडाच दिल्ली पोलिसांनी उचलला आहे का ? आणि असे असेल तर हे सारे कोणाच्या इशाऱ्यावर आणि कणाला वाचविण्यासाठी होत आहे ? दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. सध्या केंद्र सरकारने साऱ्याच संस्था आपल्या कर्मचारी नव्हे तर घरगडी बनविल्या आहेत. दिल्ली पोलीस देखील आता केंद्रीय सत्तेचे बटीक असल्यासार्खजे असून ज्यांनी देशाला सन्मान दिला, त्यांच्या सन्मानसोबत खेळत असतील तर हे लाजिरवाणे आहे. देशाच्या पंतप्रधानांना यावर बोलायला वेळ नाही, त्यांना कर्नाटकात मैदान मारायचे आहे. बाहुबली असलेला आरोपी खासदार खेळाडूंवरच राजकारणचा, ते काँग्रेसी असल्याचा आरोप करतो, दिल्ली पोलीस त्यांना आम आदमी पक्षाचे ठरवितात आणि हे सर्व करताना खेळाडूंचे लैंगिक शोषण हा मुद्दे बाजूलाच राहतो. इतरवेळी देशाचा सन्मान, अभिमान म्हणून गळा काढणारे भाजपेयी यावर मात्र मूग गिळून आहेत. कारण ब्रिजभूषण हा भाजपचा आहे. यांना देशाच्या सन्मानापेक्षाही, लेकीच्या सन्मानापेक्षाही सत्ता टिकविणे आणि सत्तेतले बाहुबली पोसणे महत्वाचे वाटतात हाच यांचा खरा चेहरा आहे.