एखादे स्वप्न पाहणे, त्याचा पाठलाग करणे, ते पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करणे हा झाला मानवी स्वभाव, प्रत्येकात तो असायलाच हवा. मात्र त्या स्वप्नाचे जर ओझे होऊ लागले आणि स्वप्न कलायला लागले तर मात्र परिस्थिती अवघड होत असते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोकून देतानाच अपयश पचवायला देखील शिकावे लागते. आज स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे अपयश पचविता येणे अवघड होत असल्याचे चित्र आहे. स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून सरकारी सेवेचे झगमगते आयुष्य असले तरी स्पर्धा म्हणल्यावर सर्वच जिंकणार नाहीत हे वास्तव देखील सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.
लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा पेपर अवघड गेला म्हणून बीडमधील एका तरुणाने आत्महत्या केली. अर्थात स्पर्धा परिक्षेत आलेल्या अपयशामुळे जीवन संपविण्याची ही काही पहिली घटना निश्चितच नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यात काही वर्षे घालविली आणि त्यानंतर नैराश्यातून आयुष्याची दिशाच बदलली अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपास आहेत. मागच्या काही वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मराठी टक्का किंवा ग्रामीण भागातील युवक वाढत आहेत, त्यामुळे लोकसेवा आयोगाच्या आणि इतरही स्पर्धा परिक्षांकडे सामान्यांचा कल वाढलेला आहे. आज मुंबई, पुणे तर सोडाच अगदी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणावर देखील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. 'आम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करतो' असे म्हणणारे विद्यार्थी सध्या दहा विद्यार्थ्यात पाच-सात तरी आरामात सापडतील अशी परिस्थिती आहे. अर्थात विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत यायचे आहे हे चांगलेच आहे. त्यांची स्पर्धा करण्याची, त्यासाठी वेळ देण्याची तयारी आहे हे देखील चांगलेच. मात्र हे सारे करत असताना, स्पर्धा परिक्षांच्या मागे उरफुटेस्तोवर धावताना परतीचे दोर तर कापले जात नाहीत ना? आणि स्पर्धा परिक्षांचे वास्तव खऱ्या अर्थाने समजले आहे का? याचा विचार केला जाणे आवश्यक आहे.
स्पर्धा परीक्षा या नावातच स्पर्धा आहे. याचा अर्थच यातून जी संधी मिळणार आहे, ती मोजक्यांनाच मिळणार आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात, मात्र त्या प्रत्येक वेळी निघणाऱ्या जागा काही शेकड्यांमध्ये असतात. म्हणून अशा परिक्षांना केवळ तुम्ही हुशार असून चालत नाही, तर त्यावेळच्या स्पर्धेत तुम्हाला टिकत आले पाहिजे, आणि हेच वास्तव सर्वांना पचवायला जड जाते. स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून करिअरचे स्वप्न पाहतानाच, जर येथे नाही जमले तर काय? याचाही विचार आवश्यक असतो. स्पर्धा परीक्षा म्हणजे हमखास यशाची खात्री नसते, आज जे 'हमखास यशाची' खात्री देत स्पर्धा परिक्षांचे क्लासेस घेतात, त्यांना स्वतःला देखील याच परिक्षांमध्ये अनेकदा अपयश आले आणि त्यानंतरच ते अशा क्लासेसकडे वळले हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून भव्य असे स्वप्न पाहायला आणि त्यासाठी झोकून द्यायला हरकत नाही. मात्र त्याचवेळी पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होत असतेच असे नाही, ज्यावेळी एखादे स्वप्न तुटते त्यावेळी त्या तुटलेल्या स्वप्नांच्या काचांनी आयुष्य रक्तबंबाळ करून न घेता देखील नवा प्रवास सुरु करण्याची क्षमता ठेवावी लागते. आज स्पर्धा परिक्षांची तयारी करणारांना हा धडा अधिक ठसविण्याची आवश्यकता आहे. ज्यांनी ज्यांनी स्पर्धा परिक्षेत यश मिळविले त्यातील बहुतेकांनी स्पर्धा परिक्षांचा मार्ग निवडतानाच स्वतःसाठी एक 'बी प्लॅन' तयार ठेवला होता हे देखील लक्षात घ्यावे लागेल. बाकी सरकारची धोरणे, आयोगाची अनास्था, अनेक वर्ष न होणाऱ्या परीक्षा, उशीरा लागणारे निकाल, त्यानंतर उदभवणारी न्यायालयीन प्रकरणे अशा अनेक दिव्यांमधून स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या तरुणाईला जावे लागत आहे, त्यामुळे हा रस्ता खडतर आहे. वाळवंटामध्ये जसे 'ओयासिस' असते तसाच हा प्रकार आहे. आणि असे ओयासिस प्रत्येकाच्या वाट्याला येत नसते या वास्तवाचे भान असणे देखील गरजेचे आहे.