सुनील क्षीरसागर
राजकारण, समाजकारण यात प्रदीर्घ काळ राहताना स्वत:वर व्यक्तीगत आरोप होवू न देणे सोपे नसते, समाजातील सर्वांनाच सर्व काळ खूष करता येत नाही मात्र तरीही त्यांच्या मनात अप्रिती निर्माण होवू नये असे वागणेही सोपे नसते. एकाच वेळी राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, उद्योग, साहित्य, संस्कृती अशा समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना आपल्याबद्दल आपलेपण निर्माण होईल असे वागणेही सोपे नसते. हा कोणता चमत्कार नसतो तर ही एक साधना असते. त्यासाठी बहुश्रूत असावे लागते, खूप काही वाचावे लागते, स्वत:तली अभ्यासूवृत्ती सतत जागृत ठेवावी लागते आणि संयम ढळू न देता वागता यावे लागते. हे सारं जमलं की मग ती व्यक्ती अव्दितीय होते. मग त्या व्यक्तीची प्रतिष्ठा कोणत्या पदावर अवलंबून राहत नाही तर समाजच त्या व्यक्तीला कायम स्वरूपी मोठेपण बहाल करीत असतो. जयदत्त क्षीरसागर यांच्या बाबतीत आज तेच झालेले आहे. विविध क्षेत्रावर आपल्या अभ्यासपूर्ण कर्तृत्वाचा ठसा उमटविलेला एकमेवा व्दितीय राजकारणी असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल.
मी मराठवाड्यात पत्रकारिता सुरू केल्यापासून माझा आणि जयदत्त क्षीरसागर यांचा एक पत्रकार आणि राजकारणाी या नात्याने संबंध येत गेला. केशरकाकू क्षीरसागर हे मराठवाड्याच्या राजकारणातलं एक मोठं नाव. त्यांचा दबदबा अगदी दिल्लीपर्यंत. त्यांचा राजकीय वारसदार म्हणून पुढे येत असलेल्या जयदत्त क्षीरसागरांसमोर राजकारण, समाजकारण करताना काकूंच्या उत्तुंग उंचीच्या छायेत स्वत:चं वेगळेपण निर्माण करण्याचं एक आव्हान होतं पण ते त्यांनी लीलया पेललं. जयदत्त क्षीरसागरांच्या राजकारणापेक्षाही त्यांचं समाजकारण, समाजाच्या वेगवेगळ्या वर्गात त्यांना असलेली स्वीकारार्हता, वेगवेगळ्या समाजघटकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेला आपलेपणा या फार महत्वाचा गोष्टी आहेत. मागच्या काही दशकात सारे राजकारण, समाजकारण जातीकेेंद्रीय होत असल्याच्या काळात सर्व जाती धर्मांमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल आपलेपणा वाटणे सोपे नसते. त्यासाठी जातीधर्मापलिकडे सर्वांना न्याय देण्याची, समजून आणि सामावून घेण्याची वृत्ती असावी लागते. ती जयदत्त क्षीरसागर यांच्यामध्ये आहे. त्यांच्या शिक्षण संस्थामधील कर्मचारी वर्गावर एक नजर टाकली अथवा विविध स्थानिक संस्थांमध्ये त्यांनी ज्या कार्यकर्त्यांना पदं दिली त्याकडे पाहिलं की हे सहज लक्षात येतं. त्यांना कोणत्या एका जातीच्या चौकटीत कधी बांधलं गेलं नाही. बीड जिल्ह्याच्या राजकारणात सामाजिक सौहार्दाचा, धार्मिक एकतेचा, ‘गंगाजमुनी तहजीब’ चा वारसा म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या भाषणात जसे संस्कृतमधील उतारे असतात अगदी तितक्याच अस्खलितपणे ते उर्दू बोलतात. त्यांचा जितका हिंदूंच्या धार्मिक गोष्टींचा अभ्यास आहे तितकाच त्यांना इस्लामही माहित आहे. म्हणूनच त्यांना कधी कोणत्या एका धर्माच्या चौकटीतही कोणी बांधलं नाही. म्हणूनच बीड जिल्ह्यात ज्या ज्या वेळी तणावाचे प्रसंग येतात त्यावेळी अनेकजण जयदत्त क्षीरसागरांकडे पाहत असतात हा मागच्या तीन-चार दशकातला सर्वांचा अनुभव आहे. एक पत्रकार म्हणून हे सातत्याने पहायला मिळालं आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी जी एक दूरदृष्टी दाखवावी लागते, त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्राचा अभ्यास करावा लागतो, त्या त्या क्षेत्रातील जाणकारांशी संवाद ठेवावा लागतो. तो संवाद ठेवण्यात जयदत्त क्षीरसागर यांचा हातखंडा आहे. त्यामुळेच कोणत्याही क्षेत्रात पुढच्या दहा-पाच वर्षात काय समस्या निर्माण होणार आहेत, कोणत्या अडचणी येवू शकतात, काय परिस्थिती उद्भवेल याचा त्यांना आगावू अंदाज असतो आणि मग त्याच अंदाजातून पुढचे दूरदृष्टीचे प्रकल्प ते आखतात. याची अनेक उदाहरणे देता येतील. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात बालाघाटावर झालेले सिंचनाचे प्रकल्प असतील किंवा 2003-04 मधील दुष्काळी परिस्थितीनंतर आकाराला आलेली माजलगाव बॅकवॉटरसारखी योजना असेल. या योजना त्या त्या वेळी अशक्यप्राय वाटणार्या होत्या पण जयदत्त क्षीरसागरांनी पाठपुरावा करून असे अनेक प्रकल्प मार्गी लावले.
राजकारण करताना प्रशासनासोबतच्या संबंधांचे एक संतुलन ठेवावे लागते. प्रशासकीय अधिकार्यांवर वचक निर्माण करतानाच त्यांच्या अडचणी लक्षात घ्याव्या लागतात. त्याचवेळी जनतेच्या समस्या सोडविण्याला देखील प्राधान्य द्यावे लागते. हे करताना ज्याला सुवर्णमध्य साधता येतो त्याचीच प्रशासनावर मांड बसत असते. जयदत्त क्षीरसागरांना सातत्याने हा सुवर्णमध्य साधता आला. म्हणूनच त्यांचे कधी कोणत्या प्रशासकीय अधिकार्यासोबत वाद झाले नाहीत किंवा खटकेही उडाले नाहीत. उलट अनेकदा, अनेक प्रकल्पांच्या बाबतीत, एखादी योजना कायद्याच्या चाकोरीत कशी बसवायची यासाठी प्रशासनातील अधिकार्यांनी त्यांना सहकार्यच केले. त्यांच्यासोबत ज्या ज्या अधिकार्यांनी कामे केली ते आजही जयदत्त क्षीरसागरांबद्दल चांगल्याच भावना ठेवून आहेत हे सातत्याने जाणवते.
राजकारण किवंा समाजकारणात उगवत्याला नमस्कार ही आजची पध्दत झालेली आहे. मात्र अशा काळातही जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय जीवनातील चढउताराचा त्यांच्या लोकप्रियतेवर कधी फरक पडल्याचे जाणवले नाही. पराभवानंतरही तितक्याच क्षमतेने पुन्हा जनतेत जाण्यचे, पराभवाची मिमांसा करताना लोकांनी हा जनादेश का दिला असेल यावर मंथन करण्याची, आत्मचिंतन करण्याचे धैर्य जयदत्त क्षीरसागर सातत्याने दाखवत आलेले आहेत. म्हणूनच त्यांची जनतेशी नाळ कधी तुटलेली नाही. आजही जिल्ह्याच्या कोणत्याही भागात कोणी गेले की जयदत्त क्षीरसागरांना ओळखणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा कोणीतरी कार्यकर्ता सहज भेटतो. त्याला मतदारसंघाच्या मर्यादा नसतात. हे वेगळेपण फार कमी लोकांना टिकवता येते. ते जयदत्त क्षीरसागरांनी टिकविलेले आहे.
त्यांच्याबद्दल एक गोष्ट आणखी आवर्जून सांगावी लागेल. मी बीडमध्ये आलो ते मराठवाडा दैनिकाच्या माध्यमातून. मराठवाडा दैनिकाची सत्ताधार्यांच्या विरोधात ठाम भुमिका होती. आपण विरोधी पक्ष म्हणूनच काम केले पाहिजे ही त्यावेळची पत्रकारीतेची भुमिका होती. बीड जिल्ह्यात त्यावेळी काकुंची सत्ता होती. जयदत्त क्षीरसागर सत्तेत होते त्यामुळे साहजिकच मराठवाड्याचा सूर त्यांच्या विरोधातल्या बातमीदारीचा, त्यावेळच्या परिस्थितीचं विश्लेषण करणारा असायचा, त्यातून अनेकदा मतभेद व्हायचे पण जयदत्त क्षीरसागरांनी कधी मनभेद होवू दिले नाहीत. काकु नंतर तर ज्यावेळी त्यांच्यावर थेट जबाबदारी आली त्यावेळी तर त्यांनी स्वत:मध्ये मोठे बदल करून घेतले. कोणी विरोध करतोय म्हणून थेट त्याला शत्रूच्या यादीत टाकायचे असं त्यांनी कधी केलं नाही. सर्व विचारांच्या व्यक्तींचा, विचारधारांचा आणि विरोधाचाही सन्मान करण्याची परिपक्वता आज जयदत्त क्षीरसागर सातत्याने दाखवत आहेत. म्हणूनच हा नेता राजकारण, समाजकारणात एकमेवाव्दितीय आहे.