कोल्हापूर - येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत जिंकत अहमदनगरची भाग्यश्री फंड ही महिला महाराष्ट्र केसरी ठरली. कोल्हापूरच्या अमृता पुजारीला उपविजेतेपद मिळाले.
अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबेल ट्रस्टतर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. येथील खासबाग मैदान येथे ही स्पर्धा झाली. भारतीय कुस्ती महासंघांच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ही स्पर्धा झाली. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे व दीपाली सय्यद यांच्या हस्ते भाग्यश्री फंडला चांदीची गदा व चारचाकीची किल्ली प्रदान करण्यात आली.खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, हिंदकेसरी योगेश दोडके, हिंदकेसरी संतोष वेताळ, माजी ऑलिपिंयन बंडा पाटील रेठरेकर, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, पैलवान बाबा महाडिक, पैलवान संग्राम कांबळे, केरबा चौगुले, कल्पना चौगुले, दिग्विजय चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहू खासबाग मैदान येथे विविध वजनी किलो गटात दोन दिवस या स्पर्धा झाली. गुरुवारी (२७ एप्रिल) महिला महाराष्ट्र केसरीसाठी मुख्य लढत झाली. कोल्हापूरच्या अमृता पुजारी विरुद्ध अहमदनगरच्या भाग्यश्री फंड यांच्यातील लढत आकर्षण ठरली. लढतीच्या दुसऱ्या फेरीत दोघींचे समान गुण झाले होते. गुण देण्यावरुन आक्षेपही नोंदविले. दरम्यान या लढतीत फंड विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. दुसरीकडे महिला महाराष्ट्र केसरीची अंतिम लढतीत अमृता पुजारीवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक दादा लवटे यांनी दिली आहे. अंतिम लढत ही रेटून नेल्याचे अमृतावर अन्याय झाला असे त्यांचे म्हणणे आहे.
बातमी शेअर करा