मुंबई - आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३च्या फायनलसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये जून महिन्यात फायनल मॅच खेळले. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी झालेल्या पहिल्या WTCच्या फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आता टीम इंडियाला विजेतेपद मिळवण्याची आणखी एक संधी साधून आली आहे.
असा आहे भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट
भारतीय संघातील खेळाडू सध्या आयपीएलचा १६वा हंगाम खेळत आहेत. आयपीएल २८ मे पर्यंत चालेल, त्यानंतर भारतीय संघ WTC फायनलसाठी इंग्लंडला रवाना होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी ही लढत इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर ७ जूनपासून सुरू होईल. गेल्याच आठवड्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फायनलसाठीचा संघ जाहीर केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतात चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी झाली होती. ही मालिका भारताने २-१ने जिंकत WTCच्या फायनलमध्ये स्थान पक्के केले होते.
खराब कामगिरीमुळे गेल्या वर्षभरापासून कसोटी संघातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेला या महत्त्वाच्या चॅम्पियनशि लढतीसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. अजिंक्य सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. या हंगामात त्याने ५ सामन्यात २०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेट आणि ५२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलेंड, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मिशेल मार्श, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाने ऑलराउंडर मिचेल मार्शचा चार वर्षानंतर कसोटी संघात समावेश केला आहे. तर अनुभवी डेव्हिड वॉर्नरला संघात स्थान देण्यात आले आहे.