Advertisement

माजलगावच्या सुसंस्कृतपणाला आ. सोळंके लावत आहेत चूड ?

प्रजापत्र | Tuesday, 25/04/2023
बातमी शेअर करा

संजय मालाणी
बीड दि. २४ : बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघ म्हणजे एक सुसंस्कृतपणा जपणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सुंदरराव सोळंके , गोविंदराव डक , राधाकृष्ण होके, बाजीराव जगताप , सोनाजीराव रांजवन अशा अनेक नावानी राजकारणात एकमेकांना विरोध करतानाही एक राजकीय संस्कृती जपली होती. एकमेकांवर टीका करतानाही कधी आक्रस्ताळेपणा न करणारी राजकीय संस्कृती माजलगाव मतदारसंघाने जोपासली होती , मात्र मागच्या काही दिवसात माजलगावचे आमदार असलेले प्रकाश सोळंकेच या संस्कृतीला चूड लावीत आहेत का असे वाटावे अशा घटना घडत आहेत.

 

मजळगावचे सध्याचे आमदार असलेल्या प्रकाश सोळंके यांची यावेळची टर्म वगळली तर त्यांचे आजपर्यंतचे राजकारण मजळगावच्या परंपरेप्रमाणेच सुसंस्कृत आणि सभ्य असे होते. सुंदरराव सोळंके यांचा वारसा निभावताना प्रकाश सोळंके यांनीही राजकारणातील सभयता जपली होती. मात्र २०१९ नंतर ते प्रकाश सोळंके हेच का असा संशय यावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी पत्रकारपरिषदेतून डाफरणारे आणि 'आम्ही खानदानी श्रीमंत आहोत ' असा श्रीमंतीचा दर्प मिरवणारे वेगळेच प्रकाश सोळंके लोकांना पाहायला मिळाले. मधल्या काळात मतदारसंघात अनेकदा त्यांचे 'डाफरने ' चर्चेचा विषय ठरले. त्यातच त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी थेट भाजपच्या कार्यकत्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा गुन्हा देखील दाखल झाला. त्यावेळी 'ही आमच्या कुटुंबाची परंपरा नाही ' असे म्हणत प्रकाश सोळंके यांच्या पत्नी पत्रकार परिषदेत भावूक झाल्या होत्या, मात्र त्यानंतर काही दिवसातच पोलिसांनी या प्रकरणात खुद्द आ. प्रकाश सोळंकेंच्या स्वीय  सहायकालाच अटक केली. त्यामुळे नेमके सोळंकेंचे राजकारण कोणत्या वाटेवरून चालू आहे हा प्रश्न आता सामान्यांना पडत आहे.
एखाद्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर त्याचा आनंदोत्सव समजू शकतो, मात्र त्या आनंदोत्सवाला उन्मादाचे स्वरूप यायला नको असते , आ. सोळंकेंच्या बाबतीत खरेदी विक्री संघातील विजयानंतर तीच परिस्थिती निर्माण आहे. राधाकृष्ण होके यांच्यासारख्या जेष्ठ राजकीय नेत्याबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य त्यांच्यातील सत्तेचा अहंकार दाखविणारे आहे.

Advertisement

Advertisement