Advertisement

काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी

प्रजापत्र | Saturday, 22/04/2023
बातमी शेअर करा

नाशिक - नाशिकमध्ये बाजार समिती निवडणुकीतल्या प्रचारावरून काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना शिंदे गटाच्या चुंबळे पिता-पुत्राकडून धमकीचे फोन आलेत. त्यामुळे खोसकर यांनी उद्विग्न होत चक्क आत्महत्या करण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांना रडू आवरले नाही. या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हिरामण खोसरकर यांनी या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. खोसकर हे सध्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार आहेत. मात्र, आमदार खोटे बोलत आहेत. ते कलाकारांपेक्षा मोठे आहेत. उलट त्यांनी आमच्या उमेदवाराला धमकावले, असे म्हणत चुंबळे पिता-पुत्रांनी हे आरोप फेटाळून लावलेत.

 

नेमके प्रकरण काय?

नाशिक जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. येथे दोन पॅनल रिंगणात आहेत. त्यात महाविकास आघाडीकडून माजी खासदार तथा माजी सभापती देविदास पिंगळे यांचे पॅनल मैदानात आहे. तर शिंदे गटाकडून माजी सभापती शिवाजी चुंभळे निवडणुकीत उतरलेत. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी देविदास पिंगळे यांच्या पॅनलचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळेच ही धमकी देण्यात आल्याचा आरोप हिरामण खोसकर यांनी केला आहे. शिवाजी चुंभळे यांचे पुत्र अजिंक्य चुंभळे यांनी फोनवरून धमकी दिल्याची तक्रार खोसकर यांनी केली आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

 

माझे जीवन संपवेन...

दोन कोटी खर्च करून तुला निवडणुकीत पाडेन. आमच्या वडिलांच्या नादी लागलास, तर भयंकर परिणाम होतील, अशी धमकी शिवाजी चुंभळे यांचे पुत्र अजिंक्य चुंभळे यांनी दिल्याचे हिरामण खोसकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. आधी धमकीचे फोन आल्याने मी चुंभळेंना ब्लॉक केले. मात्र, नंतर अनोळखी नंबरवरून फोन आला. असे होत असेल, तर गरिबांनी राजकारणातच उतरायचे नाही का, ही कसली लोकशाही. ही हुकूमशाही झाली. हे माझा अपघात करतील. हातपाय मोडून जाण्यापेक्षा मी स्वतःच माझे जीवन संपवेन असा उद्विग्न इशाराही खोसकर यांनी यावेळी दिला.

 

चुंबळेंनी आरोप फेटाळले

आमदार हिरामण खोसकर खोटे बोलत आहेत. ते कलाकारांपेक्षा मोठे आहेत. आम्ही कॉल रेकॉर्डिंग माधम्यांसमोर सादर केल्यावर सारे खरे उघड होईल, असा दावा करत शिवाजी चुंबळे आणि अजिंक्य चुंबळे या पिता-पुत्रांनी खोसकरांचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, आम्ही त्यांना तुम्हाला दोन निवडणुकात मदत केली. त्याची परतफेड करा. नाही तर दुसऱ्याचा प्रचार करू नका, अशी वारंवार विनंती केली. मात्र, त्यांनी ती विनंती फेटाळली. उलट आमच्या एका उमेदवाराला दमदाटी केली, असा आरोप चुंबळे पित्रा-पुत्रांनी माध्यमांशी बोलताना केला.

 

असे आहे चित्र

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण 18 जागा आहेत. त्यात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी व्यापारी गटाच्या दोन जागांसह एकूण तीन उमेदवारांनी माघात घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या देविदास पिंगळे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडणूक आलेत. आता 15 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत.

 

धमकीचे सत्र

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रेटी व्यक्तींना धमक्या येत असल्याने राज्यातले राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तीनदा धमक्या मिळाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नींना सुद्धा धमकी आली. अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत ते थेट सलमान खान. या साऱ्यांना यापूर्वी धमक्या मिळाल्या आहेत.

Advertisement

Advertisement