एरव्ही देशप्रेम फक्त आपल्याकडेच आहे असा मक्ता घेतलेले भाजपवाले वेगवेगळ्या विषयावर मुक्ताफळे उधळत असतात. राहुल गांधी विदेशात काही बोलले की भारतात मुक्ताफळांची जणू स्पर्धा लागते . देश, देशप्रेम, काँग्रेस आणि राहुल गांधी कसे देशविरोधी आहेत असे सगळे प्रकार तारस्वरात ओरडून सांगितले जातात . अर्थात राजकीय पक्ष म्हणून हे करायला देखील हरकत नाही. मात्र मागच्या आठवड्यात सत्यपाल मलिक यांनी पुलवामा प्रकरणाबाबत जे खळबळजनक विधान केले आहे, त्यावर ना सत्तेतले मन की बात करणारे बोलत आहेत, ना देशप्रेमाचा मक्ता घेतलेले भाजपेयी , अगदी सत्यपाल मलिक खोटे बोलत आहेत असे रेटून बोलण्याची देखील हिम्मत या लोकांना दाखविता येत नाही , यातच यांचे बेगडी देशप्रेम उघडे पडले आहे.
पुलवामा येथील अतिरेकी हल्ला आणि त्यात देशाच्या सुरक्षा जवानांचा गेलेला बळी , यामुळे साऱ्या देशातील नागरिकांना साहजिकच धक्का बसला होता. हा हल्ला चटका लावणारा होता. अशा घटना ज्यावेळी घडतात, त्यावेळी साहजिकच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतात, तसेच या हल्ल्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न पडणे देखील साहजिक्च असते. एव्हढ्यामोठ्या प्रमाणावर सुरक्षा जवान रस्त्याच्या मार्गाने का आणण्यात येत होते, याचे उत्तर त्यावेळीही दिले गेले नाही, उलट असे काही प्रश्न विचारणे म्हणजे देशविरोधी आहे, तुम्ही जवानांच्या बलिदानाचा अवमान करीत आहेत असले जावईशोध त्यावेळी लावण्यात आले होते .
मात्र कोणत्याही घट्नेबोवतीचे गूढ कधी ना कधी उलगडत असतेच. कोणत्याही घटनेवरचा पडदा काळ कधी तरी दूर करतोच. आता पुलवामा प्रकरणातील धक्कादायक सत्य उशिरा का होईना बाहेर आले आहे. आणि बाहेर आणणारे काही तथाकथित पुरोगामी , भाजपेयीच्या भाषेतील देशविरोधी नाहीत , तर भाजपने ज्यांना जम्मूकाश्मीरसारख्या तत्कालीन राज्याचा राज्यपाल केले होते. भाजपच्या अगदी सुरुवातीपासूनच्या अजेंड्यातील कलम ३७० हटविण्यामध्ये ज्यांची भूमिका फार सोसयिस्कर झाली होती असे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच हे सारे उघड केले आहे. मुळात सत्यपाल मलिक यांना जम्मूकाश्मीर सारख्या संवेदनशील राज्यात पाठविण्यात येते यावरूनच ते केंद्रीय सत्तेच्या किती विश्वासू वर्तुळातील होते हे स्पष्ट होते, त्यामुळे सत्यपाल मलिक म्हणजे काही 'वाट चुकलेले विरोधक ' नक्कीच नाहीत . म्हणूनच सत्यपाल मलिक यांनी पुलवामा प्रकरणात केंद्रीय सत्ता , तत्कालीन गृहमंत्री किती निष्काळजी होते हे दाखवून दिले आहे. हल्ला झाल्यानंतर एका राज्यपालाला पंतप्रधानांशी लगेच संपर्क साधता येत नाही आणि त्यावेळी पंतप्रधान चित्रीकरणाचे देशकार्य करीत असतात. हे सारे झाल्यानंतर पुन्हा राज्यपालांनाच 'गप्प राहा ' असे सांगितले जाते हे सारे सत्यपाल मालिकांनी सांगितले आहे. आता जर देशात इतर कोणत्या पक्षाची सत्ता असती आणि भाजप विरोधात असता, तर याच विषयावर भाषणे रान उठविले असते. सत्तेत बसलेल्याना देशद्रोही जाहीर केले असते आणि राजीनामे मागितले असते. मात्र तसे काही करण्याची आणि रान पेटविण्याची धमक आजच्या विरोधीपक्षात नाही, आणि भाजप तर सत्तेच्या बाबतीत कोडगा आहेच.
प्रश्न आहे तो इतक्या मोठ्या विषयावर भाषवले काहीच बोलायला तयार नाहीत. अनेक किरकोळ विषयावर मन की बात करणारे ५६ इंच छातिवले पंतप्रधान देशाशी संबंधित इतक्या संवेदनशील विषयावर त्यांच्या सरकारवर त्यांच्याच एकेकाळच्या सहकार्याने आरोप करूनही गप्प आहेत. राहिले बाकी काही, किमान सत्यपाल मलिक खोटे बोलत आहेत असे तरी पंतप्रधान आणि भाजपेयी का सांगत नाहीत ? याचा अर्थ मलिक यांनी सांगितलेले सारे खरे आहे आणि आता या विषयाला अनुल्लेखाने संपवायचे अशीच भाजपची भूमिका आहे का? म्हणून तर रोज वेगवेगळे विषय माध्यमांना दिले जात आहेत आणि विरोधीपक्ष देखील सत्ताधाऱ्यांच्या त्याच सापळ्यात अडकून पुलवामा विसरत आहे.