बीड दि. १५ (प्रतिनिधी ) : बीडच्या राजकारणात मुंडे बहीण भावांमधील कटुता संपल्याचे संकेत मिळत असतानाच आता जवाहर शिक्षण संस्थेवर 'आश्रयदाता ' गटातून धनंजय मुंडे बिनविरोध निवडले गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संस्थेवर वर्चस्व मिळविण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गटामध्येच निवडणूक होत आहे.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या जवाहर शिक्षण संस्थेची निवडणूक लागली आहे. या संस्थेची निवडणूक लागावी यासाठी देखील मोठ्याप्रमाणावर राजकीय व प्रशासकीय संघर्ष झाला होता. संस्थेच्या ३४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु असून यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे गट समोरासमोर येत आहेत. मात्र या निवडणुकीत 'आश्रयदाता ' गटातून धनंजय मुंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.
काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे आणि धंनजय मुंडे यांच्यातील राजकीय कटुता कमी होत असल्याच्या चर्चा होत्या, त्यातच भगवान गडाच्या नारळी सप्ताहात देखील बहीण भावांची भाषणे चर्चेचा विषय ठरली होती, या पार्श्वभूमीवर आता जवाहरचे दरवाजे धनंजय मुंडेंची बिनविरोध उघडल्याने राजकीय चर्चा जोरात आहेत.
बातमी शेअर करा