आगामी विधानसभा, लोकसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात आपली ताकद वाढवण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे.
प्रकाश आंबेडकर हे आज हैदराबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंचीच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी युतीची घोषणा केली. ठाकरे गटाशी युती झाली असली तरी महाविकास आघाडीत मात्र, 'वंचित'ला स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.
दरम्यान, असे असतानाच आज प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात असून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.