Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - राष्ट्रवादी ते महाराष्ट्रवादी

प्रजापत्र | Wednesday, 12/04/2023
बातमी शेअर करा

महाराष्ट्रातून आलेल्या ज्या मोजक्या नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात स्वतःची छाप पाडता आली किंवा स्वतःचा दबदबा निर्माण करता आला त्यापैकी महत्वाचे नेते म्हणजे शरद पवार. शरद पवार यांचे राजकारण काँग्रेसी मुशीतले , मात्र गांधी परिवाराच्या निर्णयाच्या विरोधात अनेकदा बंड केले ते देखील पवारांनीच . त्यामुळे काँग्रेसी मुशीतला हा नेता गांधी कुटुंबाच्या गुडबुकमध्ये मात्र कधीच नव्हता. तरीही केवळ स्वतःच्या बळावर शरद पवारांनी त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून दिला होता , त्यामागे भक्कम जनमतापेक्षादेखील आजच्या भाषेत ज्याला 'जुगाड की राजनीती ' म्हणतात त्याचा भाग अधिक राहिलेला आहे. त्यामुळेच आता त्यांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रवादी होण्याची वेळ आली आहे. अर्थात उद्या कर्नाटकसारख्या राज्यात पक्षाला काही टक्के मते मिळावी तर पुन्हा या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळेल देखील, मात्र निवडणूक आयोगाच्या दर्जापेक्षाही राष्ट्रीय राजकारणात शरद पवारांचे  जे स्थान डळमळीत होत आहे त्याचे काय ?

 

ज्या पक्षाचा मूळ आधारच प्रादेशिक आहे, अशा एखाद्या पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता काढून घेतली गेली तर त्यांच्यावर फार मोठा परिणाम होतो असे काही आता उरलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस काय किंवा तृणमूल काँग्रेस काय, यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्याने लगेच त्यांच्यावर फार काही परिणाम होण्याची शक्यता फारशी नाही. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेला असला तरी आजही   पक्षाचे लोकसभेत पाच आणि राज्यसभेत चार खासदार आहेत.याशिवाय महाराष्ट्र विधानसभेत ५४, केरळ विधानसभेत दोन आणि गुजरात विधानसभेत एक आमदार आहेत.पक्षाची एकूण सदस्यसंख्या २० लाखाहून अधिक आहे.  १९९९ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने पक्ष म्हणून राष्ट्रीय राजकारणावर महाराष्ट्राच्या बाहेर किती प्रभाव टाकला यावर मतमतांतरे असू शकतील, मात्र या पक्षाचे नेते म्हणून शरद पवार यांना मात्र आतापर्यंतही राष्ट्रीय राजकारणावर आपला प्रभाव टिकवून ठेवता आला होता. त्याला मात्र आता धक्के बसू लागले आहेत.

 

मुळात राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळी पी ए संगमा आणि तारिक अन्वर हे महाराष्ट्राबाहेरचे नेते शरद पवार यांच्यासोबत होते, तरीही राष्ट्रवादीची खरी भिस्त होती ती शरद पवार आणि महाराष्ट्रवरच . राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवायचा असेल तर किमान चार राज्यांमध्ये ठराविक मते मिळवावी लागतात, यासाठी राष्ट्रवादीला या नेत्यांचा फायदा झाला. आता हा दर्जा टिकवायचा म्हणूनच राष्ट्रवादी  कधी गुजरातेत तर कधी इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवीत असायची, पण राष्ट्रवादीच्या राजकारणाचे मूल्यमापन व्हायचे ते त्यांच्या महाराष्ट्राच्या कारकिर्दीवरच . त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाने लगेच राष्ट्रवादीला फार काही परिणाम भोगावे लागतील असे वारा नाही. कारण कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर कदाचित चित्र बदललेले असेलही.

 

मात्र खरा मुद्दा आहे तो शरद पवारांचे राष्ट्रीय राजकारणातील जे स्थान डळमळीत होत आहे त्याचा. मुळातच लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा जनाधार सातत्याने कमी होत आहे.  लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १९९९ मध्ये २.२७ टक्के मते मिळाली होती, ती २००४ मध्ये १.८० टक्के, २००९ मध्ये १.१९ टक्के, २०१४ मध्ये १.०४ टक्के आणि २०१४ मध्ये घसरली होती. पाच वर्षांनी २०१९ मध्ये ०.९३ टक्के होती. पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत दोन टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्य मिळू शकले नाही.त्यातही काँग्रेसचे स्थान डळमळीत होत असताना शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणात स्वतःभोवती राजकारण फिरविण्याची संधी होती, मात्र त्यांचे स्वतःचे राजकारणच मुळात बेभरवशाचे असल्याने त्यांना ते साधता आलेले नाही. शरद पवार कधी कोणासोबत जातील हे सांगता येत नाही असे मत आताशा त्यांचे निकटवर्तीय देखील मान्य करतात. मोदींना आणि भाजपला विरोध करणारे शरद पवार अचानकच मोदींना उपयोगी असे बोलतात , कधी राष्ट्रवादीचा गुजरातसारख्या राज्यात अप्रत्यक्ष फायदा भाजपला होतो हे यापूर्वी अनेकदा अनुभवायला आलेले आहे. तेच शरद पवार भाजपसोबत बोलणी करायला देखील तयार असतात , त्यामुळेच आता त्यांच्या नावाभोवती विरोधी पक्षाचे देखील एकमत होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. एकेकाळी राष्ट्रीय राजकारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व असलेल्या पवारांना १९९९ ते २०२३ या २४ वर्षाच्या म्हणजे २ तपांच्या कालखंडात राष्ट्रवादीला व्यापक जनाधार असलेला पक्ष बनविता आले नाही हे कटू असले तरी वास्तव आहे. पवारांचे स्वतःचे मतदान आहे, पवारांना मानणारा वर्ग आहे, पण राष्ट्रवादीचे काय ? महाराष्ट्रात हा पक्ष आजही मूठभर सरंजामदारांचाच उरलेला आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. पवारांची राजकीय भूमिकांबद्दलची असंदिग्धता आज त्यांच्या राजकीय विस्तारात मोठी अडचण ठरू पाहत आहे, त्याचे काय करायचे हा मोठा प्रश्न असणार आहे. 
 

Advertisement

Advertisement