राष्ट्रपुरुषांच्या नावे हेटाळणी केल्याचीही तक्रार
बीड : येथील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्याला सुनावणी दरम्यान अपमानास्पद वागणूक दिली आणि राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव हेटाळणीपूर्वक घेऊन अपमानित केल्याची तक्रार बीड येथील विधिज्ञ एल. आर. गंगावणे यांनी राज्याच्या निवडणूक विभागासह वकील संघाकडे केली आहे.
या तक्रारीमुळे प्रशाकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बीड येथील विधिज्ञ एल. आर. गंगावणे यांनी निवडणूक विभाग आणि वकील संघाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते वडवणी नगरपंचायतीच्या आरक्षण सोडती संदर्भाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमोर बाजू मांडत असताना जिल्हाधिकारी रेखावार यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला तसेच ‘तुला वकील कोणी केले? तू वकील आहेस काय ? जास्त आंबेडकर बनण्याचा प्रयत्न करू नकोस ’ असे शब्द वापरले. त्यानंतरही जिल्हाधिकारी रेखावार यांनी आपले कोणतेच म्हणणे एकूण घेतले नाही,त्यांनी आपला आणि राष्ट्रपुरुषांच्या अपमान केल्याचे गंगावणे यांनी म्हटले असून याप्रकरणी जिल्हाधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी पदावरील अधिकार्याने राष्ट्रपुरुषांबद्दल असे उदगार काढणे दुर्दैवी असल्याचे देखील गंगावणे यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकार्यांकडून प्रतिसाद नाही
दरम्यान या तक्रारीसंदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे मत जाणून घेण्यासाठी ’प्रजापत्र’ ने त्यांना संपर्क केला, मात्र जिल्हाधिकारी रेखावार यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाहीं, त्यामुळे त्यांची बाजू मांडता आली नाही.
यापूर्वीही अनेकांच्या तक्रारी
दरम्यान बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार सुनावणी दरम्यान अपमानास्पद वागणूक देतात, तसेच सुनावणीच्या वेळा पाळीत नाहीत अशा तक्रारी काहींनी केल्या होत्या. यापूर्वी बीड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता गोल्हार यांनी देखील अशीच अपमानास्पद वागणुकीची तक्रार केली होती.
हेही वाचा