देशभरात एक मार्च ते नऊ एप्रिल दरम्यान सर्वाधिक अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाल्याचे समोर आले आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली. त्यात देशभरातील एकूण पावसापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 80 टक्के इतर इतर ठिकाणी 28 टक्के पावसाची नोंद झाली.
मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल 1 लाख 73 हजार 893 हेक्टरवरच्या पिकाचे नुकसान झाल्याची भीती आहे. सध्याही अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून, याचा जबर फटका आंबा पिकाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.
महाराष्ट्राला झोडपले
सध्याही अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार काही नुकसानीची पाहणी करत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पाहणी करणार आहेत. त्यात भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 1 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान सर्वाधिक अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाल्याचे समोर आले. त्यात देशभरातील एकूण पावसापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 80 टक्के तर इतर ठिकाणी 28 टक्के पावसाची नोंद झाली.
असे झाले नुकसान
मार्च महिन्यात तीन वेळेस अवकाळी पाऊस झाला. त्यात 4 ते 9 मार्च या काळात गारपीट झाली. त्यामुळे 15 जिल्ह्यांतील 38 हजार 606 हेक्टर पिकाचे नुकसान झाले. त्यानंतर मार्च महिन्यात 15 ते 21 तारखेदरम्यान अवकाळी पाऊस झाला. त्याचा 30 जिल्ह्यांना फटका बसला. त्यामुळे 1 लाख 7 हजार हेक्टरवरचे पीक मातीमोल झाले. त्यानंतर झालेल्या पावसामुळे 28 हजार 287 हेक्टरवरच्या पिकाचे नुकसान झाल्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी
- रत्नागिरी - 45 हेक्टर
- रायगड - 50 हेक्टर
- सिंधुदुर्ग - 37 हेक्टर
- नाशिक - 18003 हेक्टर
- धुळे - 29 हेक्टर
- जळगाव - 53 हेक्टर
- पुणे - 3 हेक्टर
- अहमदनगर - 7305 हेक्टर
- सातारा - 47 हेक्टर
- बीड - 2762 एकर
- धाराशिव - 2856 हेक्टर
- बुलढाणा - 114 हेक्टर
- अकोला - 5859 हेक्टर
- नागपूर - 7 हेक्टर
फळपिकाला फटका
अवकाळी पावसामुळे आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा, काजू, कलिंगडासह मका, गहू, कांदा, हरभरा पिकाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. कोकणात आंबा, कोकम, जांभूळ, काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
आज होणार बैठक
महाराष्ट्रात एकीकडे अवकाळी पाऊस सुरू आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या वारीवर आहेत, अशी टीका विरोधकांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला अयोध्येपेक्षा शेतकरी महत्त्वाचा असल्याचे म्हटले. त्या पार्श्वभूमीवर सरकार खडबडून जागे झाले आहे. सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली आहे. यावेळी कृषिमंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काय तोडगा निघतो पाहावा लागेल.