बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यातील विविध भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वादळी पावसासह गारपिटही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे बळीराजा मात्र हवालदिल झाला आहे.
ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे तापमानात चढ-उतार होत आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काल बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बोरगाव व बीड तालुक्यातील पोखरी घाट, बेलखंडी येथे गारपीट झाली. आष्टी तालुक्यातील कडा परिसरात अवकाळी पाऊस झाला. तसेच वडवणीत विजांच्या कडकडाटासह एक तास पाऊस झाला. जालना, हिंगोली, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
राज्यभरात 8 ते 10 एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात 10 एप्रिलपर्यंत गारपीटीसह जोरदार पाऊस होईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीदरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यामुळे राज्यावरही ढगांची दाटी झाली असल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.
वादळी पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली