Advertisement

रेल्वे स्थानकावर सापडलेल्या चिमुकलीचा शांतिवनात सांभाळ

प्रजापत्र | Saturday, 08/04/2023
बातमी शेअर करा

बीड : परळी रेल्वे स्थानकावर सापडलेल्या एक वर्षाच्या छोट्या बाळाची आणि त्याच्या आईची अडीच वर्षानंतर भेट झाली. आर्वी येथील शांतिवन आणि ठाण्याचे श्रद्धा फाउंडेशन या संस्थांच्या पुढाकारामुळे हा भावनिक योग जुळून आला. जेव्हा तेलंगणातील मुळ रहिवाशी असलेल्या या माय-लेकीची भेट झाली, तेव्हाचे चित्र पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. बीड बालकल्याण समितीत हा सोहळा संपन्न झाला.

 

अडीच वर्षांपूर्वी परळी रेल्वे स्थानावर एक वर्षाचे बाळ काही सामाजिक कार्यकर्त्यांना सापडले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर डॉ. शालिनी कराड यांनी या बाळाची तपासणी करून बाळाच्या आईचा शोध घेण्यास पोलिसांना मदत केली. तेव्हा रेल्वे स्थानकावर फिरणारी एक मनोरुग्ण महिला या बाळाची आई असल्याचे निष्पन्न झाले. तेंव्हा डॉ. कराड यांनी शांतीवनचे संस्थापक दीपक नागरगोजे यांना ही माहिती दिली. पोलिस आणि नागरगोजे यांनी या माय लेकरांना बीड बाल कल्याण समिती समोर हजर केले असता समितीने या बाळाचा ताबा संगोपनासाठी शांतिवनकडे दिला आणि आईला येरवडा येथील मनोरुग्ण रुग्णालयात न्यायालयाच्या आदेशाने पाठवले.

 

या ठिकाणी दोन वर्ष उपचार केल्यानंतर या महीलेत सुधारणा झाली. तेंव्हा ही महिला तेलंगणा राज्यातील परघी येथील असल्याचे समजले. येरवडा प्रशासनाने या महिलेला पुढील तपास आणि पुनर्वसनासाठी ठाणे येथील डॉ भरत वाटवानी यांच्या श्रद्धा फाउंडेशन या मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थेकडे सोपवले. या संस्थेने या महिलेच्या गावाचा शोध घेऊन तिला तिचे नातेवाईक सापडून दिले. या महिलेची पूर्ण ओळख पटल्यानंतर शनिवारी शांतिवनकडे असणारे तिचे बाळ बालकल्याण समितीच्या आदेशाने तिच्याकडे सोपविण्यात आले. याप्रसंगी शांतिवनचे दीपक नागरगोजे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सुरेश राजहंस, संतोष वारे, छाया गडदे, बालस्नेही समीर पठाण, तत्वशिल कांबळे आदींची उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement