इंडियन प्रीमियर लीगमध्ये शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्जने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीतही पंजाबमध्ये एका धाकड फलंदाजाची कमी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे येत्या १० एप्रिलपासून धडाकेबाज इंग्लिश फलंदाज लियाम लिविंगस्टोन मैदानात उतरणार आहे. आनंदाची बाब म्हणजे इंग्लंड एंड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून लियामला फिटनेस सर्टिफिकेट मिळणार आहे. लियाम चार महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये कसोटी क्रिकेट पदार्पणावेळी दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे लियाम प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळला नाही.
आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिविंगस्टोन १० एप्रिलला भारतात येणार आहे. पंजाब किंग्जचा पुढील सामना ९ एप्रिलला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध होणार आहे. या सामन्यात लियाम खेळणार नाही. पण १३ एप्रिलला होणाऱ्या चौथ्या सामन्यात लियाम मैदानात उतरण्याची शक्यता आहे. लियामने म्हटलंय की, तो लवकरच पूर्ण फिट होऊ शकतो. मी आता त्या ध्येयापर्यंत पोहचत आहे. मागील दोन महिन्यांचा कालावधी खूप कठीण होता. पण आता मी क्रिकेट खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे.
दोन दिवसांच्या आत मला तिकडे जाण्याची परवानगी मिळेल, अशी आशा आहे. मी खेळण्यासाठी आग्रही आहे. पुढील ४८ तासांत मला याबाबत परवानगी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. मागील सीजनमध्ये पंजाबने लियामला वर्षभराच्या मानधनाच्या रुपात ११ कोटी रुपये दिले होते. यंदाच्या हंगामातही लियामला याच रक्कमेत रिटेन करण्यात आलं आहे.