Advertisement

जिल्हावासीयांना भावतेय जिल्हाधिकाऱ्यांची लोकाभिमुखता

प्रजापत्र | Saturday, 08/04/2023
बातमी शेअर करा

बीड दि. ७ : जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकारी , मात्र त्यांना अगदी सहजपणे भेटता येते, त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडता येते , जिल्हाधिकारी ते ऐकून घेतात , लगेच संबंधितांना संपर्क करतात आणि प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात , पुन्हा हे सारे करताना कोणाचा वशिला लागत नाही, किंवा कोणाच्यातरी ओळखीनेच जावे लागेल असेही नसते . हे केवळ सामान्यांच्याच बाबतीत घडते असेही नाही, प्रश्न मग ते व्यक्तीचे असोत, समूहाचे, कोणत्याही घटकाचे , जिल्हाधिकारी त्यात स्वतः पुढाकार घेऊन ते मार्गी कसे लागतील हे पाहतात . बीड जिल्ह्यात सामान्यांच्याप्रतिची ही लोकाभिमुखता निर्माण केली आहे, ती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी. म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांची हीच लोकाभिमुखता सध्या जिल्हावासीयांच्या चर्चेचा विषय झालेली आहे.

बीडच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून काही महिन्यांपूर्वी दीपा मुधोळ मुंडे यांनी पदभार घेतला. एकतर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी आणि दुसरे म्हणजे जिल्ह्याशी त्यांचे नाते देखील, त्यामुळे त्यांच्याबद्दल जिल्हावासीयांची भावना अगत्याची, कौतुकाची आणि एका वेगळ्या आस्थेची होती. म्हणूनच त्यांच्या स्वागताला झालेली गर्दी देखील वेगळीच. मात्र ही गर्दी आली तरी स्वतः दीपा मुधोळ मुंडे मात्र केवळ या गर्दीत हरवल्या नाहीत, तर येणाऱ्या लोकांकडून त्या जिल्हा समजून घेत गेल्या. 'जिल्ह्याची समस्या काय, जिल्ह्यातल्या लोकांसाठी काय केले पाहिजे, विकासाचा अजेंडा काय असावा ' अशा अनेक विषयांचा अभ्यास  त्यांनी केला आहे. त्यांनी आल्याबरोबर सुरुवातीला काय केले तर 'अमुक याच वेळेत जिल्हाधिकाऱ्यांना भेटता येईल ' हा बोर्ड काढून टाकायला लावला . त्यांच्याकडे भेटायला येणारी संख्या मग दिवसेंदिवस वाढत आहे. कोणालाही सहज उपलब्ध होणाऱ्या जिल्हाधिकारी अशी ओळख सांभाळतानाच त्याचा प्रशासकीय कामावर परिणाम होणार नाही हे देखील त्यांनी पहिले आहे.

जिल्हाधिकारी म्हणजे सुमारे ५०-६० समित्यांचे अध्यक्षपद . त्यांच्याकडे येणारे विषय तर यापेक्षाही कितीतरी अधिक . त्यामुळे प्रत्येक विषयाला न्याय देताना करावी लागते ती कसरत , दीपा मुधोळ मुंडे मात्र लीलया करीत आहेत. हे करताना पुन्हा सारे काही वरवरचे आहे असेही नाही. उद्योग मित्रांची त्यांनी घेतलेली बैठक आजपर्यंतची या विषयावरची सर्वाधिक काळ चाललेली बैठक , त्यातून त्यांनी जे काही सांगितले आणि जी काही भूमिका घेतली ती उद्योजकांना ऊर्जा देणारी होती. शासनाचे रोजगार मेळावे म्हणजे तशी औपचारिकताच असायची आतापर्यंत ,  पण या रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी मुंडे यांनी केलेले भाषण म्हणजे जिल्ह्याबद्दलची आणि तरुणाईबद्दलची कणव आणि तळमळ सांगणारे होते. एखादी मोठी बहीण ज्या  तिडकीने बोलेल ती भावना त्या भाषणात होती, महिला मेळाव्याचेही तेच आणि अगदी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतानाची आत्मीयता देखील तशीच . दीपा मुधोळ मुंडे केवळ अधिकारी नाहीत तर त्यापलीकडे जाऊन त्या जिल्ह्यासाठी काही तरी करू पाहत आहेत ही त्यांची लोकाभिमुखता सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली आहे.

Advertisement

Advertisement