Advertisement

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

प्रजापत्र | Thursday, 05/03/2026
बातमी शेअर करा

 पाटोदा दि.५(प्रतिनिधी):तालुक्यातील येवलवाडी शिवारात असलेल्या पवनचक्कीवर दरोडा टाकून केबल व साहित्य चोरणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत.

     पोलीस ठाणे पाटोदा हद्दीतील येवलवाडी येथील शिवारात रिनिव्ह पॉवर कंपनीने उभारलेल्या पवनचक्कीवर सौरभ बाबुराव येवले (वय २२) व शुभम बबन सॉडगे हे वॉचमन म्हणून कार्यरत आहेत. दि.२५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांना मारहाण करून पवनचक्कीतील केबल व इतर साहित्य चोरून नेले होते. या घटनेप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा बीड व पाटोदा पोलीस करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणातून माहिती मिळाली की, मधुकर आबा काळे रा.खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव,व बबलू जालीधर शिंदे रा. दसमेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव यांनी त्यांच्या साथीदारांसह हा गुन्हा केला असून ते खामकरवाडी शिवारातील एका फटाक्याच्या कारखान्यावर काम करत आहेत.या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी अनिल उर्फ शेड्या आबा काळे रा. खामकरवाडी, ता. वाशी – फरार, शिवाजी संजय शिंदे रा. खामकरवाडी, ता. वाशी – फरार व अमोल रमेश शिंदे रा. येरमाळा, ता. कळंब, जि. धाराशिव यांच्या मदतीने पवनचक्कीवरील केबल चोरी करून विक्री केल्याची कबुली दिली. आरोपींकडून २० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पाटोदा पोलीस करीत आहेत.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे, पोहे सोमनाथ गायकवाड, मारुती कांबळे, राहुल शिंदे, बाळू सानप, आनंद मस्के, अर्जुन यादव, अशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे यांनी केली.
 

Advertisement

Advertisement