बीड : राज्य विधान परिषदेच्या ६ जागांवरील निवडणुकांच्या निकालाबाबतचे एक्झिट पोलचे सारे अंदाज चुकवत महाविकास आघाडीने राज्यात भाजपला धोबीपछाड दिली आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासह भाजपचे परंपरागत गड म्हणून ओळखले जाणाऱ्या नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीने यश मिळविले आहे. सहापैकी ४ जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्या आहेत, तर भाषला केवळ एका जागेवर , ते देखील काँग्रेसमधून आयात केलेल्या उमेदवाराच्या माध्यमातून समाधान मानावे लागले आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी मताधिक्याचा विक्रम करीत पहिल्या पसंतीत विजय मिळविला . सतीश चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपचे शिरीष बोराळकर यांना अवघ्या ५८७४३ मतांवर समाधान मानावे लागले.
निवडणुकीतील विजयानंतर काय म्हणाले शरद पवार ?
http://www.prajapatra.com/729
पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडले आहे.
पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली आहेत.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.पुणे शिक्षक मतदारसंघ महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर यांनी मिळविला आहे तर अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी होत आहेत.
केवळ धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल यांनी विजय मिळविला. ते मूळचे काँग्रेसचे असून त्यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता.
विधान परिषद निकालाचे प्रजापत्र चे कार्यकारी संपादक संजय मालाणी यांनी केलेले विश्लेषण.