Advertisement

मला तर दारूवाली बाई म्हणून हिणवले

प्रजापत्र | Thursday, 06/04/2023
बातमी शेअर करा

परळी - उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हटल्यामुळे महाराष्ट्रतील राजकारण तापले आहे. यावर प्रतिक्रिया देताना माझ्यावर तर दारूवाली बाई म्हणून विरोधकांनी टीका केली होती, अशी खंत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

 

 

फडणवीस व्यवस्थित काम करतील

भाजप स्थापना दिवसानिमित्त बीडमध्ये एका कार्यक्रमात पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. त्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारण हा काटेरी रस्ता आहे. राजकारणातील सिंहासनदेखील काटेरी असते. त्यामुळे राजकारणात टीका होतच राहणार. कधी कधी टीका अत्यंत खालच्या पातळीवरही केल्या जातील. मला विश्वास आहे की, टीकेमुळे देवेंद्र फडणवीस व्यथित होणार नाही. ते त्यांच काम व्यवस्थित करतील.

 

 

रेल्वेस्टेशनवर माझे फोटो लावले

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मीसुद्धा राजकारणात अनेक टीकांना सामोरी गेली आहे. माझा डिस्टिलरी प्लान्ट आहे. त्यामुळे काही विरोधी पक्षातील नेत्यांनी माझ्यावर दारुवाली बाई अशा शब्दांत टिप्पणी केली होती. माझ्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. तेव्हा अत्यंत खालच्या पातळीवर टीका झाली, माझे प्रचंड ट्रोलिंग झाले. अक्षरश: रेल्वेस्टेशनवर माझे फोटो लावण्यात आले. माझे फोटो लावून काही पाकिटे वाटली. माझा अपमान करण्यात आला.

 

 

वाट्याला केवळ फुलेच येणार नाही

पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणात केवळ फुलेच वाट्याला येणार नाहीत. तर टीकाही वाट्याला येईल. अनेकदा खालच्या पातळीवरची टीका वाट्याला येईल. मला विश्वास आहे की, देवेंद्र फडणवीस या टीकेमुळे व्यथित होणार नाहीत. ते त्यांचं काम व्यवस्थित करतील. या सर्व गोष्टी राजकारणाचा एक भाग आहेत. कोणीही असं करू नये असे वाटते, परंतु ते होत राहील.

Advertisement

Advertisement