Advertisement

म्युझिक सिस्टीममध्ये बॉम्ब लपवून लग्नात पोहोचला अन् काही क्षणात...

प्रजापत्र | Thursday, 06/04/2023
बातमी शेअर करा

लग्नात भेट म्हणून देण्यात आलेला होम थिएटर म्युझिक सिस्टीम (home theatre music system) सुरु करताच त्याचा स्फोट झाल्याने नवरदेव आणि त्याच्या भावाचा मृत्यू झाला. स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये चौघे जखमी झाले. तसंच ज्या खोलीत होम थिएटर म्युझिक सिस्टीम ठेवण्यात आला होता, त्याचं छत आणि भिंती कोसळल्या. दरम्यान पोलिसांनी तपास केला असताना म्युझिक सिस्टीममध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. नवरीमुलीच्या प्रियकराने हा म्युझिक सिस्टीम भेट म्हणून दिला होता. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) कबीरधाम जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षी. नवरदेव हेमेंद्र मेरावी याने घरी गेल्यावर सर्व भेटवस्तू खोलून पाहताना म्युझिक सिस्टीमही सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्याने वायर इलेक्ट्रिक बोर्डाला जोडताच मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, त्याचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटात त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. 

 

 

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, म्युझिक सिस्टीम वगळता सर्व गोष्टी चांगल्या स्थितीत होत्या. दरम्यान पोलिसांनी तपास केला असता म्युझिक सिस्टीममध्ये कोणीतरी बॉम्ब लपवला असल्याने हा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली, यानंतर पोलिसांनी लग्नात भेटवस्तू दिलेल्या पाहुण्यांची यादी काढली. यावेळी त्यांना नवरीमुलीच्या माजी प्रियकराने तिला हा म्युझिक सिस्टीम भेट दिला असल्याचं समोर आलं.

 

 

पोलिसांनी आरोपी सरजू याची ओळख पटवली आणि नंतर त्याला बेड्या ठोकल्या. चौकशीदरम्यान त्याने आपली प्रेयसी लग्न करत असल्याने आपण संतापलो होतो, यामुळेच म्युझिक सिस्टीममध्ये बॉम्ब लपवून तो तिला भेट म्हणून दिला असं त्याने सांगितलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

 

 

पोलिसांच्या माहितीनुसार, हेमेंद्र मेरावी याचं 1 एप्रिलला लग्न झालं होतं. स्फोटात त्याचा आणि त्याचा भाऊ राजकुमार यांचा मृत्यू झाला आहे. तसंच चौघे जखमी असून यामध्ये एका दीड वर्षाच्या बाळाचाही समावेश आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Advertisement

Advertisement