मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि त्यांचे दूरसंचार युनिट जिओ इन्फोकॉम यांनी सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज उभारले आहे. हे कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज म्हटले जात आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजने परकीय चलन कर्जाच्या रूपात विविध बँकांच्या संघाकडून दोन टप्प्यांत 5 अब्ज डॉलर जमा केले आहेत. जे कर्ज बँक/वित्तीय संस्थांच्या समूहाकडून घेतले जाते त्याला सिंडिकेट कर्ज असे म्हणतात.
55 बँकांकडून 3 अब्ज डॉलर घेतले कर्ज
गेल्या आठवड्यात रिलायन्सने 55 बँकांकडून 3 अब्ज डॉलर्स कर्ज घेतले होते. रिलायन्स जिओ इन्फोकॉमने 18 बँकांकडून दोन अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज घेतले आहे. 31 मार्चपर्यंत 3 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते, तर या आठवड्यात मंगळवारी 2 अब्ज डॉलर कर्ज घेतले आहे.
5G नेटवर्क सुरू करण्यासाठी पैसे खर्च केले जातील
रिलायन्स जिओ ही रक्कम भांडवली खर्चासाठी वापरणार आहे. हा पैसा जिओ देशभरात 5G नेटवर्क सुरू करण्यासाठी खर्च करेल. तैवानमधील सुमारे दोन डझन बँकांसह, तसेच बँक ऑफ अमेरिका, HSBC, MUFG, Citi, SMBC, Mizuho आणि Credit Agricole या जागतिक बँकांसह 55 बँकाकडून प्रारंभिक 3 अब्ज डॉलर कर्ज उभारले गेले.
मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत ठरले
दरम्यान, मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत, अंबानी 83.4 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील 9 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.