कोल्हापूर - काँग्रेस आमदार पी. एन. पाटील आज स्वतःहून ईडीसमोर हजर झाले. त्यांना ईडीने फेब्रुवारीमध्ये समन्स बजावले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी चौकशीकडे पाठ फिरवली होती. मात्र आज त्यांची चौकशी झालीच नाही.
पी. एन. पाटील हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ईडीची बेधडक कारवाई सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणलेत. या कारवाईची खमंग चर्चा सुरू आहे.
नेमके प्रकरण काय?
आमदार पी. एन. पाटील हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांना फेब्रुवारी महिन्यातच ईडीने चौकशीसाठी समन्स बोलावले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी ईडीसमोर हजेरी लावली नाही. त्यानंतरईडीने पुणे, कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी छापेमारी केली. आता आज पाटील हे स्वतःहून ईडीसमोर हजर झाले. मात्र, त्यांची आज चौकशी झाली नाही. त्यांना ईडी नव्याने समन्स पाठवून पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचे समजते.
पाटील कसे रडारवर?
ईडीने यापूर्वी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर छापे मारले होते. कागल तालुक्यातला (जि. कोल्हापूर) सेनापती कापशीमधील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडहिंग्लज तालुक्यातील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या कर्जपुरवठा प्रकरणी ही कारवाई केली होती. तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफही ईडीच्या रडारवर आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पाच अधिकारी, तीन माजी संचालकांचीही ईडीने चौकशी केली. त्यानंतर पी. एन. पाटीलही ईडीच्या रडावर आलेत.
बँकेला सर्वाधिक नफा
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात यावर्षी सर्वाधिक नफा झाल्याची माहिती, बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ईडीच्या छापेमारीनंतर अनेक अफवा उडाल्या. मात्र, त्यानंतरही ठेवीदारांनी विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच ठेवीदारांनी कुठेही पैसे गुंतवावे. मात्र, जास्त लाभापायी चेन मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करू नका, असे आवाहन त्यांनी केले.