असं म्हणतात, मानवाला जेवढं अंतराळ समजलं आहे तेवढा ज्ञान त्याला पृथ्वीवरील समुद्राबद्दल नाही. पृथ्वीचा बहुतांश भाग हा महासागरांनी व्यापलेला आहे. या अथांग महासागरांच्या पोटात नेमकं काय दडलं आहे हे अद्यापही मानवाला पूर्णपणे समजलेलं नाही. अनेकदा या समुद्राच्या पोटात अशा गोष्टी आढळतात की मानवाला त्याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. असाच काहीसा अनुभव अमेरिकेतील काही मच्छीमारांना आला. सामान्यपणे मध्यम किंवा मोठ्या आकाराचे मासे मारणाऱ्या या मच्छीमारांनी एका फार मोठ्या आकाराच्या माशाशी पंगा घेतला आणि ते या माशाबरोबर तब्बल 2 तास झुंज देत होते. हा संपूर्ण थरारक प्रकार समुद्रात मोठमोठ्या लाटांवर सुरु होता हे ही विशेष. नेमकं काय घडलं आणि या संघर्षाचा शेवट कसा झाला जाणून घेऊयात...
8 जणांना करावा लागला संघर्ष
अमेरिकेत मच्छीमारी करणाऱ्या 8 जणांच्या एका गटाला तब्बल 317 किलोग्राम वजनाचा एक मासा सापडला. हा टूना (Tuna Fish) मासा जाळ्यात पकडल्यानंतर तो बोटीवर आणण्यासाठी या 8 जणांना तब्बल 2 तास संघर्ष करावा लागला. या सर्व संघर्षामध्ये या 8 जणांकडे मासेमारी करण्यासाठी वापरलं जाणारं काही सामानही तुटलं. अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ कॅप्टन टिम ओस्ट्रेइचच्या नेतृत्वाखाली मासेमारी करायला गेलेल्या टीमबरोबर हा संपूर्ण प्रकार घडल्याचं वृत्त 'न्यूजवीक'ने दिलं आहे.
फोटो केले शेअर
एकूण 56 तासांच्या या मासेमारीच्या दौऱ्यादरम्यान हा एक मासा मारण्यासाठी आम्हाला 2 तास लागले अशी माहिती ओस्ट्रेइचने 'फॉक्स न्यूज'शी बोलताना दिला. या माशाबरोबरची झुंज सुरु असताना अनेकजण तर 2 ते 3 मिनिटांमध्ये थकत होते. हा मासा गळाला लागावा म्हणून टाकलेला चारा तिने 10 मिनिटांमध्ये फस्त केला. अनेकदा चारा खाऊन ही ब्लूफिन टूना मासेमारी करणाऱ्या टीमला चकवा देत होती. चारा खाऊन ही टूना बोट 800 फूट दूर जायची आणि पुन्हा बोटी जवळ यायची. हा संपूर्ण प्रकार 24 मार्च रोजी घडला. या संपूर्ण घटनाक्रमाचे फोटो ओस्ट्रेइच यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.
4 किमी पाठलाग
या टूना माशाला पकडण्यासाठी या टीमने तब्बल 4 किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला. चारा खाऊन गेल्यानंतर 45 मिनिटांनंतर हा ट्यूना मासा पुन्हा बोटीजवळ आला. यावेळेस त्याला पकडण्याच्या प्रयत्नात या टीमकडील मासेमारी करण्याची भाल्यासारखी काठीही तुटली.
अखेर हा मासा बोटीवर
अखेर या माशाला पकडण्यासाठी एकाने समुद्रात उडी घेत त्याला वर लोटलं तर बोटीवरील लोकांनी त्याला हातानेच वर खेचलं. तब्बल 8 जणांनी संपूर्ण जोर लावून हा मासा बोटीवर घेतला. न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार एकूण 8 जणांना हा मासा पकडण्यासाठी मदत करावी लागली.