बीड दि. ४ (प्रतिनिधी ) : महाराष्ट्राच्या अनेक भागात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. राज्य शासनाच्या पातळीवर कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यावर खलबते सुरु असतानाच बीड जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात कोरोना प्रतिबंधक लसींचा मात्र मोठ्याप्रमाणावर तुटवडा असल्याचे चित्रर आहे. कोव्हीसील्ड आणि कॅव्हॅक्सिन या दोन्ही लसी बीड जिल्ह्यात सरकारी यंत्रणेत पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे राज्याच्या बऱ्याच भागात कमी अधिक फरकाने असेच चित्र असल्याचे सांगितले जाते.
राज्यभरात सध्या कोरोनाची चर्चा पुन्हा जोरात सुरु आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधामध्ये महत्वाची भूमिका असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा मात्र राज्यातच तुटवडा असल्याचे चित्र आहे. आज घडीला बीड जिल्ह्यात कोव्हीशील्ड लस सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत उपलब्ध नाही, तर कॅव्हॅक्सिन लस काही दिवसांपूर्वी उपलब्ध होती, मात्र मार्च अखेरीस त्या लसीची मुदत संपल्याने आता त्या लसींचा वापर करता येणार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आरोग्य विभागात सरकारी पातळीवर अगोदर लस उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे
नागरिकांचाही नाही प्रतिसाद
मागील आठवड्यापर्यंत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ज्या भागांमध्ये डल्सीचा दुसरा डॉस घेण्याचे प्रमाण कमी होते अशा भागांमध्ये अधून मधून लसीकरण हाती घेण्यात येत होते, मात्र या लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता अशी माहिती आहे. आता मात्र लसीचा उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे.
पुण्यातही तुटवडा
पुणे महानगरपालिकेच्या एकही रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध नाही. लसींचा साठा नसल्याने नायडू, कमला नेहरू, ससून हॉस्पिटल, सुतार दवाखाना यासारख्या मनपाच्या रुग्णालयात लसीकरण बंद झाले आहे.