Advertisement

अन्यथा नव्या कर्णधारासोबत खेळण्यासाठी तयार राहा : MSD

प्रजापत्र | Tuesday, 04/04/2023
बातमी शेअर करा

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार एमएस धोनीने सोमवारी रात्री आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 12 धावांनी विजय मिळवल्यानंतर आपल्याच संघाच्या गोलंदाजांना एक कडक इशारा दिला आहे. सामन्यानंतर प्रेझेंटेशनदरम्यान धोनी म्हणाला की, आम्हाला वेगवान गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. समोरचा संघ काय करतो हे पाहणेही महत्त्वाचे आहे. संघातील खेळाडूंनी नो बॉल टाकू नये आणि वाईड बॉल कमी करणे आवश्यक आहे. आम्ही खूप जास्त धावा देत आहोत. असेच सुरू राहिले तर माझा दुसरा इशारा असेल आणि त्यानंतर संघाला नव्या कर्णधारासोबत खेळावे लागेल.

 

 

विकेट पाहून आश्चर्य वाटले - धोनी
धोनी पुढे म्हणाला की, चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी पाहून मला आश्चर्य वाटले. मला वाटले की सामना कमी धावांचा होईल, पण सामना उच्च स्कोअरिंगचा झाला. 5-6 वर्षांत प्रथमच मैदान खचाखच भरले होते. विकेट पुढे कशी जाते हे पाहावे लागेल.

 

 

शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज धोनी, 2 षटकार ठोकले
कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शेवटचे षटक टाकत असलेल्या मार्क वुडच्या चेंडूवर सलग दोन षटकार ठोकले. पहिल्या डावात CSK कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2 जबरदस्त षटकार ठोकले. डावाच्या 20व्या षटकात त्याने मार्क वुडचा दुसरा चेंडू डीप पॉइंटवर आणि तिसरा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारला. पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. यासोबतच धोनी हा आयपीएल सामन्यात शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे.

 

धोनीने आयपीएलच्या 5 हजार धावा पूर्ण केल्या
चेपॉकमध्ये महेंद्रसिंह धोनीने 3 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 12 धावा केल्या. यासोबतच त्याने आयपीएलमध्ये ५ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो 5वा भारतीय आणि एकूण 7वा खेळाडू ठरला. यासाठी धोनीने 237 सामने खेळले. धोनीने 20 व्या षटकातच आपल्या डावातील दोन्ही षटकार मारले. आयपीएलच्या 20व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर एकूण 55 षटकार आहेत. त्याच्यानंतर पोलार्डच्या नावावर 33, रवींद्र जडेजाच्या नावावर 26 आणि हार्दिक पंड्याच्या नावावर 25 षटकार आहेत. या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 23 षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

 

चेन्नई 12 धावांनी विजयी
आयपीएल 2023 च्या सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सचा 12 धावांनी पराभव केला. हा संघ जवळपास चार वर्षांनंतर त्याच्या होम ग्राउंड चेपॉकवर खेळत होता. येथे यलो आर्मीने गेल्या 22 सामन्यांमध्ये 19 वा विजय मिळवला आहे. या विजयासह चेन्नईचा संघ लखनऊच्या बरोबरीने पुढे आला आहे. दोघांमधील हा दुसरा सामना होता. पहिला सामना लखनऊने जिंकला होता.लखनऊने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 7 गडी गमावून 217 धावा केल्या. आयपीएलमध्ये 24व्यांदा 200+ धावा करण्याचा पराक्रमही संघाने केला. प्रत्युत्तरात लखनऊच्या फलंदाजांना 20 षटकांत 7 गडी बाद 205 धावाच करता आल्या.

 

Advertisement

Advertisement