Advertisement

कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Saturday, 01/04/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - तालुक्यातील देपेगाव येथील शेतकऱ्याने कापसाला भाव नसल्याने व कर्जदारांना सततचा तगाद्याला कंटाळून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) रोजी घडली. विठ्ठल गणेशराव काळे (वय ५२ वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

माजलगाव तालुक्यातील देपेगाव येथील शेतकरी विठ्ठल गणेशराव काळे यांना ३.५ एक्कर शेती आहे. शेतीवरच त्यांचा पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यात घरात कापूस पडलेला आहे. त्यास भाव नसल्याने व पतसंस्था व खाजगी सावकारांच्या सततच्या तगाद्याने विठ्ठल काळे हे मानसिक तणावात होते. त्यातच त्यांनी आज (दि.१) रोजी सकाळी त्यांच्या भावाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 
याची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बोडके, पोलीस कॉन्स्टेबल पोटे यांनी भेट दिली. यावेळी शेतकरी विठ्ठल काळे यांच्या खिशात चिट्टी आढळली. त्यात कापसाला भाव नसल्याचे व पतसंस्था व खाजगी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे लिहिले असल्याचे कळते. सदरील शेतकऱ्याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement

Advertisement