बीड : यावर्षी मॉन्सून चांगला असेल असे अंदाज बांधले जात असतानाच हिंदी महासागरात निर्माण झालेल्या अल निनोचा प्रभाव मॉन्सूनवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. आतापर्यंत जून महिन्यापर्यंतचे टंचाई आराखडे बनविले जायचे आता ऑगस्ट महिन्यापर्यंत पाऊस झाला नाही तर पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे करायचे याचे नियोजन करून आराखडे तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. तर आज राज्याचे मुख्य सचिव व्हीसीद्वारे संभाव्य टंचाई परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे आता नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
यावर्षी राज्यात मान्सून वेळेवर येईल असे अंदाज वर्तवण्यात आले होते, मात्र 'अल निनो ' ते अंदाज चुकविला अशी भीती व्यक्त होत असून पावसाळा लांबू शकेल असे प्रशासनाचे अंदाज आहेत. त्यामुळेच आता पावसाळा लांबलाच तर काय करायचे याच्या नियोजनासाठी प्रशासन कामाला लागले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी नुकतीच एक बैठक घेतली आहे. यात जिल्ह्यातील पाणीसाठ्याची आढावा , संभाव्य टंचाई रोखण्यासाठीच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली . तसेच ऑगस्ट महिन्यापर्यंतचे टंचाई आराखडे तयार करण्याचे निर्देश जिल्हापरिषद आणि नगरपालिकांना देण्यात आले आहेत.
आष्टी वगळता इतरत्र नसेल फार चिंता
या बैठकीत कोणत्या शहराला आणि गावांना कोठून पाणीपुरवठा होतो आणि संबंधित जलसाठ्यांची परिस्थिती काय आहे याची माहिती घेण्यात आली.. यात बीड शहराला बिंदुसरा आणि माजलगाव बॅक वॉटर मधून पाणी मिळते या ठिकाणी पुरेसा साथ आहे. गेवराई शहर (जायकवाडी ) वडवणी (उर्ध्व कुंडलिका ), माजलगाव (माजलगाव प्रकल्प ) धारूर , केज, अंबाजोगाई (मांजरा ) आदी ठिकाणी पुरेस पाणीसाठा असल्याने तितकीशी अडचण येणार नाही. तर आष्टी (ब्रह्मगाव तलाव ) येथे ३१ % पाणीसाठा आहे. पाटोदा (बांगरवाडी आणि महासांगवी तलाव , १९-२० % पाणीसाठा ) शिरूरकासार (उथळा , २४ % पाणीसाठा ) या गावांमध्ये नियोजन करावे लागणार आहे.
सिंचनासाठीच्या पाण्यावर निर्बंध
जलसंपदा विभागाने सिंचनासाठी पाण्याची किती आवर्तने द्यायची, कोणत्या प्रकल्पातून द्यायची याचा फेरआढावा घेण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ३३ % पेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी देऊ नये असे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
अवैध उपसा रोखण्यासाठी पथके
ब्रह्मगाव (आष्टी ) महासांगवी (पाटोदा ) आदी ठिकाणी अवैध पाणी उपसा सुरु असल्याचे समोर आले. येथील पाणी उपसा थांबविण्यासाठी मोटारी जप्त करण्याची कारवाई करावी आणि सर्वच प्रकल्पातून विनापरवानगी पाणी उपसा होणार नाही यासाठी पथके स्थापन करून पर्यवेक्षण करावे अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.