Advertisement

अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात

प्रजापत्र | Sunday, 26/03/2023
बातमी शेअर करा

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटात असलेले अंबादास दानवे हे एकनाथ शिंदेंच्या सोबत जाण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. असं झालं तर उद्धव ठाकरेंसाठी तो मोठा धक्का असणार आहे यात शंका नाही. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा पार पडला. त्यावेळी आमदार संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे माझ्या संपर्कात असून राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं म्हटलं आहे. त्यामुळे अंबादास दानवे एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

काय म्हटलं आहे संजय शिरसाट यांनी?

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दावा केला आहे की “अंबादास दानवे माझ्या संपर्कात आहेत. कधीही काहीही होऊ शकतं. अंबादासने मला सांगितलं बाई (सुषमा अंधारे)खूप डोक्याच्या वर झाली. राजकारणात तुम्ही असं काही समजू नका कधीही काहीही होऊ शकतं.” असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

 

सुषमा अंधारेंची नक्कल आणि टीका

आपल्या छोट्या भाषणात संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंची नक्कलही केली. “संदिपान भुमरे माझा भाऊ, हा माझा भाऊ, तो माझा भाऊ असं ही बाई (सुषमा अंधारे) बोलते. आम्ही ३८ वर्षे घालवली आहेत शिवसेनेत तू काल आली आहेस गं तू आम्हाला शिकवणार का? ” असं म्हणत नंतर संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे संपर्कात असल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे अंबादास दानवे शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सुषमा अंधारे यांचं पक्षातलं महत्त्व वाढत असल्याने दानवे नाराज आहेत असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.

 

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार अल्यापासून ठाकरे गटाला गळती

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. ४० आमदार आणि १३ खासदारांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील शिंदे गटात प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. तर आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा यापूर्वीच शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आलेला आहे. मात्र ते आमदार कोण ही नावं सांगितली जात नव्हती. आज पहिल्यांदाच संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. अंबादास दानवे या सगळ्या प्रकरणावर काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

Advertisement

Advertisement