धाराशिव - विद्युत वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात घुसून अभियंत्यासह त्यांच्या कर्मचार्यास शिवीगाळ करून, लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांच्यासह त्यांचे चिरंजीव अभिराम पाटील, स्वप्नील पाटील यांच्यासह अज्ञात बारा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शुक्रवार, 24 मार्च रोजी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र फकीरा पवार व स्टोअर किपर राजू काळे हे महावितरण कंपनीच्या विश्रामगृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मेजर स्टोअरमध्ये कामकाज करीत होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुधीर केशवराव पाटील, त्यांचे चिरंजीव अभिराम सुधीर पाटील, स्वप्नील पाटील व इतर दहा ते बारा लोक अचानक कार्यालयात घुसले व शिवीगाळ केली. त्यांना शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, त्यांनी कार्यकारी अभियंता पवार यांच्या गच्चीस धरून खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केली. यावेळी स्टोअर किपर राजू काळे हा भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यालाही लाथाबुक्क्यांनी या लोकांनी जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी वरील लोकांनी, ‘नोकरी करायची असेल तर आम्ही सांगेल तसेच वागायचे व नीट नोकरी करायची, अन्यथा काटा काढून टाकीन’, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देवून तेथून निघून गेले. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
याप्रकरणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुधीर पाटील, अभिराम पाटील, स्वप्नील पाटील व इतर 12 अज्ञात लोकांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.