राज्य सरकारने एसटी प्रवासात महिलांना 50 टक्क्यांची सूट दिली आणि राज्यातील एसटीमध्ये महिला प्रवासी संख्या झपाट्याने वाढली. चार दिवसात राज्यभरात तब्बल 48 लाख महिला प्रवाशांनी अर्ध्या तिकिटावर प्रवास केला आहे.
महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास हा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर राज्यभरातील बसमध्ये महिला प्रवाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. निर्णयानंतर 4 दिवसात राज्यात सुमारे 48 लाख महिला प्रवाश्यानी प्रवास केलाय. जो एकूण प्रवासी संख्येच्या 30 टक्के आहे. एकट्या परभणीत 65 हजार तर धाराशिवमध्ये 57 हजार महिलांनी चार दिवसात या योजनेचा लाभ घेतला आहे.
राज्यभरातील अनेक बस स्थानकावर आणि बसमध्येही महिला प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. ताई, माई, अक्का, काकू, मावशी आणि आजी सगळ्या प्रवासाला निघाल्या. कुणी देवस्थानाला कोणी जात आहे तर कुणी वास्तुशांतीसाठी जातेय. कुणी पर्यटनाला निघाले तर कोणी रोजच्या प्रवासातमुळे होणाऱ्या वैयक्तिक खर्चात कपात करण्यासाठी निघालेय. कुणी रुग्णालयात तर कुणी बाजारला निघालेय. घरातील कामधाम सर्वच आटोपून सकाळीच या महिला तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जात आहेत. साधी बस असो की शिवशाही या गाडीमध्ये अर्धे तिकीट आकारले जात असल्यामुळे महिला प्रवाशाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कायम तोट्यात असते, त्याची विविध कारण आहेत. त्यातील महत्वाचे कारण म्हणजे विविध घटनांना दिल्या जाणाऱ्या सवलती. महामंडळाकडून आतपर्यंत 39सवलती दिल्या जात होत्या. ज्यात आता 75 वर्षावरील नागरिकांना मोफत आणि आता महिलांना 50 % तिकीट सवलत दिली जात आहे. याचा मोठा आर्थिक भार हा महामंडळावर पडतोय..
फक्त परभणीतील परिस्थिती काय?
परभणी आणि हिंगोली मिळून सात डेपो आहेत. सात डेपोचे महिन्याचे उत्पन्न 11 कोटी रुपये इतके आहे. 41 सवलतीची रक्कम ७ कोटी रुपये इतकी होते. 7 कोटी हे थेट शासनाकडे जातात, ते शासन देईल तेंव्हा देईल मात्र प्रत्यक्ष विना सवलत मिळणारी रक्कम चार कोटी रुपये इतकी आहे. या 4 कोटीत 400 गाड्या त्यांचे डिझेल, पगार, मेंटेनेस करावे लागते. अशी परिस्थिती प्रत्येक डेपोची आहे. राज्य सरकारने प्रवासात विविध सवलत दिली पण याचा भार एसटी महामंडळावर पडतोय. आधीच आर्थिक अडचणीत असलेले एसटी महामंडळ आणखी अडचणीत जाणार की काय? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.