Advertisement

हवामान विभागाचा इशारा

प्रजापत्र | Tuesday, 21/03/2023
बातमी शेअर करा

मुंबई - राज्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे राज्य सरकारने त्वरीत पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी होत असतानाच पुन्हा एकदा मोठे संकट शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 24 मार्चपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे शेती पिकांना फटका बसत आहे.

 

राजा हवालदिल

या शक्यतेमुळे शेती पिकांचे नुकसान होण्याचा संभव जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली आहे. यातून शेतकरी हवालदिल आहे. पण त्यानंतर दुसऱ्या संकटामुळे त्रास वाढणार आहे.

 

राज्यभर हलक्या पावसाचा अंदाज

आज पहाटेपासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राज्यात आज बहुतांश भागात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. सहसा दुपारी किंवा त्यानंतर हलक्या सरी दिसू शकतील, असे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रांतर्फे सांगण्यात आले आहे.

 

अशी असेल स्थिती

कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.समुद्राकडून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस कोसळत आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात पाणी होते ज्यामुळे मुंबई आणि उपनगरात आज पाऊस झाला.सकाळी वाऱ्यांची दिशा ही पूर्वेकडून असते. मात्र, आज वाऱ्यांची दिशा पश्चिमी असून त्याचा परिणाम म्हणून पाऊस पडल्याचेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.पुढाल 48 तासात उत्तर महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.आगामी तीन तीन दिवस महाराष्ट्रातील तापमानात दोन ते तीन अंशांची घट बघायला मिळेल.

 

24 मार्चनंतरची स्थिती

24 मार्चनंतर महाराष्ट्रात पुन्हा काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या महिन्यात दोन वेळा आलेल्या अवकाळीतून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. त्यातच पुन्हा अवकाळीचा इशारा दिल्याने शेतकऱ्याने जगायचं कसं ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या राज्यात रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरू आहेत. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

 

वातावरणात गारवा, घ्या काळजी

राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे वातावरणात वेळोवेळी बदल जाणवत आहेत. अचानक झालेल्या वातावरण बदलांमुळे आरोग्यावरही परिणाम होत असून सर्दी, खोकल्यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.बदलत्या हवामानामुळे आजारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे डाॅक्टरांचा सल्ला आहे.

 

 

Advertisement

Advertisement